लातूरच्या पाणीटंचाईवर बोलताना सर्वच राजकीय मंडळी पाण्याबाबत आम्ही राजकारण करणार नाही, असे गेल्या चार महिन्यांपासून आवर्जून सांगत आहेत. मात्र, प्रत्येक जण राजकारण साधण्याचा प्रयत्न सातत्याने करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लातूरच्या पाणीटंचाईचा अंदाज आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांची मंडळी पाण्याबाबत पक्ष म्हणून काही मदत करण्याच्या मन:स्थितीत होती. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम सुरू केले. पण प्रत्येक जण सामाजिक बांधिलकी म्हणून व अडचणीत सापडलेल्यांना मदत करायची असते. ही संस्कृती जपण्यास आपण मदत करीत आहोत, यात कसलेही राजकारण आणले जाणार नसल्याचे सांगत आहेत, मात्र प्रत्येक जण पाण्याच्या निमित्ताने टीका करण्याची संधी सोडत नसल्याचे चित्र दिवसेंदिवस गडद होत आहे. लातूरकरांना पाणी देण्याची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची आहे. आम्ही सातत्याने मागणी करूनही सरकारला पाण्याचे गांभीर्य नाही, असा आरोप काँग्रेस पक्षाने केला. राष्ट्रवादीने महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना पाण्याचे गांभीर्य नाही. चार महिन्यांपासून साई व नागझरी बंधाऱ्यांतील पाणी शेतकरी उचलणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे निवेदन जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना दिले होते, मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पाण्याचा लाभ साखर कारखान्यांना होत असल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी जिल्हय़ात शिवसेनेचे काम बेताचे असतानाही मुंबईतून रसद आणून सर्वात आधी पाण्याचे मोफत टँकर सुरू केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टाऊन हॉलच्या मदानावर जंगी सभा घेत टँकरच्या संख्येत पाचपट वाढ केली. शिवसेनेच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांना रात्रंदिवस कामाला लावत त्यांची राजकीय इच्छाशक्ती वाढवण्याचे काम शिवसेनेने या निमित्ताने केले. काँग्रेसच्या वतीने आमदार अमित देशमुख यांनी विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या साहाय्याने लातूर शहरात ३५ व ग्रामीण भागात ३५ अशा ७० टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. पाणी देण्याची जबाबदारी केवळ सरकारची आहे असे सांगून लोक माफ करणार नाहीत. आपला सहभाग असला पाहिजे हे शिवसेनेच्या उपक्रमानंतर का होईना, काँग्रेसच्या लक्षात आले. मनसेचे काम तसे िलबूटिंबूच. तरीही न्यायालयीन खटल्याच्या निमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जिल्हय़ाचा दौरा केला. मोफत पाणीवाटप आदी उपक्रमाची त्यांनी सुरुवात केली. ‘वरातीमागून घोडे’ याप्रमाणे सर्वात उशिरा सत्ताधारी भाजपला जाग आली. आपले सरकार मिरजेहून रेल्वेने पाणी देत आहे हे लोकांना कळावे व सर्वच पक्ष आपापल्या परीने मदत करीत असल्यामुळे आपण मागे राहिलो तर नाचक्की होईल हे लक्षात आल्यामुळे भाजपच्या १५ खासदारांनी एकाच दिवशी जिल्हय़ाचा दौरा करीत टाऊन हॉलच्या मदानावर जंगी सभा घेतली. रेल्वेचे आलेले पाणी नीटपणे वितरित होत नसल्याबद्दल महापालिका यंत्रणेवर आगपाखड केली. उन्हाळा संपत आल्यानंतर शहरातील ५ हजार कुटुंबांच्या घरी २०० लीटरच्या पाण्याच्या टाक्या देण्याची घोषणा केली. भाजपचे कार्यकत्रे टप्प्याटप्प्याने ते वितरित करणार असल्याचे जाहीर केले. टाऊन हॉलच्या मदानावरील जलजागरण सभेला महापालिका निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाचे स्वरूप प्राप्त झाले. राजकारणी मंडळी गळय़ात माळ घालून व हातात टाळ-चिपळय़ा घेऊन भजन करण्यासाठी राजकारणात येत नाहीत, हे खरे आहे, मात्र असे असले तरी काही विषय राजकारणापासून बाजूला ठेवण्याचा सर्वानीच एकत्रितपणे प्रयत्न करायला हवा, अशी अपेक्षा बाळगली तर ती चूक लोकांची आहे असे समजू नये. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या क्षमतेनुसार पाण्याच्या राजकारणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्वच काही वाईट घडते आहे असे नाही. अशा राजकारणाच्या स्थितीतदेखील जलयुक्त लातूरचे सुरू झालेले काम हे दीर्घकालीन परिणाम करणारे आहे, हे लक्षात घेऊन यात राजकारण न होता सर्वानी एकत्र येऊन काम केले पाहिजे हे लक्षात घेतले व सर्वच जण आपापल्या परीने या उपक्रमाला मदत करीत आहेत, हे सुचिन्ह आहे. मांजरा नदीच्या पुनरुज्जीवन कामाने वेगळा आदर्श निर्माण केला. लातुरात येणाऱ्या कोणालाही या कामाला भेट देण्याचा मोह आवरत नाही. एका अर्थाने बाहेरून येणाऱ्या मंडळींसाठी ते पर्यटन केंद्रच बनले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा