उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकीसह चार गावांना वरदान ठरलेल्या तेरणा धरणातून शेतीसाठी मोठय़ा प्रमाणात पाणीउपसा सुरू आहे. चार मोठय़ा पावसात साचलेल्या थोडय़ा फार पाण्याचे नियोजन करून पाणीपुरवठा करण्याऐवजी पाटबंधारे विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची डोळेझाक सुरू असल्यामुळे तेर, गोवर्धनवाडी, कावळेवाडी व ढोकी गावांत तीव्र टंचाईची स्थिती आहे.
तेर, ढोकी शिवारात असलेल्या तेरणा मध्यम प्रकल्पात जुल-ऑगस्टमध्ये पाणी नव्हते. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात झालेल्या चार-पाच पावसात या प्रकल्पात संपूर्ण उन्हाळाभर पुरेल इतका पाणीसाठा झाला होता. मात्र, परिसरातील बडे शेतकरी आपल्या विहिरींतील पाणीउपसा करण्याऐवजी थेट धरणात कृषिपंप टाकून मोठय़ा प्रमाणात पाणीउपसा करीत आहेत. माजी आमदार ओमप्रकाश राजेिनबाळकर यांच्या गोवर्धनवाडी, तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या तेर गावासह ढोकी व कावळेवाडी, थोडसरवाडीतील ग्रामस्थांना नियोजनाअभावी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
मागील तीन आठवडय़ांपासून धरणालगतच्या वरील गावच्या लोकांनी वेगात पाणीउपसा सुरू केला असून या बडय़ा मंडळींनी पाण्याची चोरी करण्यासाठी युद्धपातळीवर मोठा फौजफाटा उभा केला आहे. जवळपास दीड हजार मोटारींच्या साह्य़ाने धरणापासून १० ते ३० किलोमीटर कावळेवाडी, बुकनवाडी शिवारापर्यंत पाणी नेऊन रात्रीत ७ ते १० विहिरी भरून ऊस, ज्वारी, हरभरा आदी पिकांना रात्रंदिवस पाणी देण्यात येत आहे. पिके जगविण्यासाठी शेतकरी पाणीउपसा करीत आहेत. या मागचा उद्देश चांगला असला, तरी बडय़ा आणि राजकारणात पुढारपण करणाऱ्यांची संख्या यात अधिक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा