मराठवाडय़ात हजारहून अधिक टँकरचा प्रवास ८९ हजार किलोमीटरचा
सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>
मालमोटारी आणि एकामागे एक जाणाऱ्या उसाने भरलेल्या बैलगाडय़ा एका बाजूला आणि दुसरीकडे १०८० टँकरने मराठवाडय़ात सुरू असणारा पाणीपुरवठा नक्की किती किलोमीटरचा? दिवसाला ८९ हजार ११२ किलोमीटर टँकरचा प्रवास होतो. या प्रवासाला प्रशासनानेही चांगलाच हातभार लावला आहे.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील पैठण तालुक्यात ऊस बहरलेला असताना काही गावांना ११० किलोमीटर ते १२४ किमी.वरून पाणी आणले जाते. खरेतर हे अंतर एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात किंवा अन्य जिल्ह्य़ात जाण्याएवढे आहे. मात्र, ज्या भागात जायकवाडी धरण आहे, त्याच पैठण तालुक्यात असा अंतराचा गोंधळही पद्धतशीरपणे जपला जात आहे. केवळ एकटय़ा पैठण तालुक्यात ही स्थिती नाही.
जालना जिल्ह्य़ातील बदनापूर तालुक्यातील लोधेवाडी या गावाला ११६ किलोमीटरवरून पाणी आणले जात आहे. ९० ते १०० किलोमीटरहून पाणीपुरवठा होणारी अनेक गावे सध्या मराठवाडय़ात असल्याने ‘टँकर आवडे सर्वाना’ याची प्रचीती देणारी काही उदाहरणे ठळकपणे पुढे येत आहेत. अलीकडेच टँकरचा दर प्रतिकिलोमीटर २ रुपयांवरून तीन रुपये ४० पैसे करण्यात आला आहे.
मराठवाडय़ातील टँकरने हजारी पार केली आणि टँकर किती किलोमीटर धावतो, याची माहिती ‘लोकसत्ता’ने मिळविली. काही ठिकाणी धरणांमध्ये पाणीसाठाच शिल्लक नसल्याने टंचाईग्रस्त भागात टँकर लावल्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती असली तरी काही भागांत मात्र टँकर लावताना प्रशासनाने विहिरी अधिग्रहण आणि उसाचे क्षेत्र याचा विचारही केला नाही, असेच दिसून येत आहे. मराठवाडय़ातील बहुतांश कारखान्यांमध्ये सध्या गाळप हंगाम जोरात आहे. उसाच्या गाडय़ांमुळे रहदारीला अडथळा होईल, एवढी त्याची वाहतूक होत आहे. दररोजची गाळपाची आकडेवारी वाढते आहे. मात्र, काही तालुक्यांमध्ये टँकर ही अपरिहार्य गरज असली तरी काही गावांना पाणी देण्यासाठी तहसीलदारांनी ढिल्या हाताने मंजुऱ्या दिल्या असल्याचे दिसून येत आहे. जवळचे पाण्याचे स्रोत शोधण्याऐवजी दूरचा पाण्याचा स्रोत दाखवायचा आणि जवळून पाणी उचलायचे, असाही प्रकार केला जात आहे. बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यात आणि शहर पाणीपुरवठय़ात असे प्रकार घडत आहेत. पैठण तालुक्यातील अंतरवली खांडी, पुसेगाव यासीनपर, सोनेवाडी या गावांना केला जाणारा पाणीपुरवठा ११० ते १२४ किलोमीटरचा आहे. बदनापूर तालुक्यातील लोधे या गावाला भगवान अण्णा नागवे यांच्या सोमठाणा येथील विहिरीवरून पाणी आणले जाते. ते तब्बल ११६ कि.मी.वर आहे. वास्तविक गावांना केंद्रबिंदू मानून परिसरातील विहिरींचा शोध घेतला असता तर त्या अधिग्रहित करूनही पाणी देता आले असते. मात्र, पाण्याचा शाश्वत स्रोत शोधत प्रशासनाने मात्र, बहुतांश पाणीपुरवठा एमआयडीसीच्या केंद्रावरून केल्याचे औरंगाबाद जिल्ह्य़ात दिसून येत आहे. या अनुषंगाने पैठणचे तहसीलदार महेश सावंत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की काही गावांना जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्यामुळे अंतर वाढले आहे. तर काही गावांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठय़ाच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह आहे. पाण्यातील टीडीएसचे प्रमाण अधिक असल्यामुळे अंतर वाढलेले आहे. काही प्रस्ताव फेटाळले होते. मात्र, पाणी शुद्धतेवर प्रश्नचिन्ह असल्याने अंतर अधिकचे दिसते.
पाण्याच्या शुद्धतेबाबत विचार नाही..
मराठवाडय़ातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. मात्र, नगर आणि नाशिक जिल्ह्य़ातून पाणी सोडल्याने जायकवाडी धरणात ३९.७९ अब्ज घनफूट पाणी अजूनही आहे. मात्र, याच तालुक्यात अधिक टँकर्सही आहेत. काही ठिकाणी मात्र टँकरच्या पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. आष्टी नगर पंचायतीत शहरात ४० कि.मी.वरून ३० टँकरने पाणी आणले जाते. म्हणजे एका गावात टँकरचा किलोमीटरचा फेरा १२०० कि.मी.चा आहे. पाण्याच्या शुद्धतेबाबत कुणीच प्रश्न विचारत नाही. परिणामी लहान मुलांना पोटाचे विकार आणि हगवणीचा त्रासही जाणवू लागला असल्याचे येथील नागरिक सांगतात.
टँकरची धाव..
पैठण तालुक्यातील मिरखेडा (९२ कि.मी.), रांजणगाव-दांडगा (९० कि.मी.), सोनेवाडी (१२४ कि.मी.), सानपवाडी (९८कि.मी.), कोळीबोडखा (९६ कि.मी.), चौढाळा (९२ कि.मी.), कडेठाण तांडा (९२ कि.मी.) ही टँकरची धाव आहे. टँकरच्या खेपा वाढल्या म्हणून किलोमीटरची लांबी वाढली, अशी परिस्थिती जरी काही ठिकाणी असली तरी टँकरचा वापर सढळ हाताने आतापर्यंत केला गेला. यापुढे तर टँकर अपरिहार्यच असल्याने ही संख्या वाढतच जाईल, असे सांगण्यात येते.
इतिहास टँकरसंख्येचा
२०१३-१४ २१३६
२०१४-१५ ११४४
२०१५-१६ ४०१५
२०१६-१७ ९४०
या वर्षांचा आकडा १०८०