सहाजण अटकेत; १० जणांविरुद्ध गुन्हा
औरंगाबाद : शहरातील हर्सूल भागातून गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी १९ तलवारी गुरुवारी ताब्यात घेतल्या. जहाँगीर कॉलनीतील आलिम खान रहीम खान पठाण (वय ३५) याच्या घरावर छापा टाकून तीन व अन्यत्र १६ तलवारी सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सहा जणांना अटक केली असून दहा जणांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख मोहसीन शेख मतीन यास चार तलवारी, नफीस शहा शरीफ शहा यास तीन, इलियास उर्फ ईलू इसाक कुरेशी यास दोन तलवारी, शेख परवेज शेख महेराज, शेख आमेर शेख इकबाल, शेख कलीम उर्फ इलियास शेख, शेख समीर शेख मोहम्मद अय्युब, शेख असर व शेख आवेज शेख मेहराज यांना प्रत्येकी एक तलवार एक हजार रुपयांत विक्री केल्याची कबुली आलिम खान याने पोलिसांना दिल्याचे उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सांगितले. यावेळी सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक अमोल देशमुख, अनिल वाघ आदी उपस्थित होते. औरंगाबाद शहरात यापूर्वी २८ व २९ मे रोजी एका कुरिअर कंपनीच्या माध्यमातून मागवलेल्या तलवारींचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यामुळे पोलीस दलातही खळबळ उडाली आहे. औरंगाबादेत वर्षांच्या सुरुवातीला, त्यानंतर ७ मार्च रोजी कचऱ्यावरून तर ११ मे च्या रात्री दोन गटातील किरकोळ वादातून, अशा तीन दंगली उसळल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी पोलिसांनी तलवारी बाळगल्याप्रकरणी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी पत्रकारांना दिली.
औरंगाबादेत शस्त्रसाठा सापडल्याची ही मे महिन्यानंतरची दुसरी घटना आहे. मे महिन्यात एका बडय़ा कुरिअर कंपनीच्या माध्यमातून मोठय़ा तलवारी मागवण्यात आल्या होत्या. त्याच्या पंधरा दिवस अगोदरच शहरातील शहागंज, राजाबाजार, संस्थान गणपती आदी भागातील दोन समाजात मोठी दंगल उसळली होती. या दंगलीत अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारीही गंभीर जखमी झाले होते. जाळपोळीत एका ज्येष्ठ नागरिकाचा तर गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला होता.