मोरया, मोरयाचा जागर, ढोल-ताशांचा गजर, भगव्या रंगाचे फेटे बांधून गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी सार्वजनिक गणेश मंडळाची धामधूम सायंकाळी सुरू झाली आणि श्रींची प्रतिष्ठापना मोठय़ा उत्साहात करण्यात आली. या वर्षी मराठवाडय़ावर दुष्काळाचे सावट असल्याने अनेक गणेश मंडळांनी साधेपणानेच हा उत्सव करण्याचे ठरविले. अनेकांनी देखाव्यांसाठी येणारा खर्च दुष्काळग्रस्तांना देण्याचे ठरविले. विघ्न दूर करणारी देवता अशी गणेशभक्तांची धारणा असल्याने प्रतिष्ठापनेनंतरही अनेकांनी पावसाची प्रार्थना केली.
सकाळच्या सत्रात घरगुती गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची लगबग होती. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बसविण्यावरही औरंगाबादकर अधिक सजग असल्याचे या वर्षी प्रामुख्याने दिसून आले. विशेषत: मातीच्या गणेश मूर्ती असाव्यात, असे ठरवून काही कार्यशाळाही घेण्यात आल्या होत्या. संस्थान गणपती, राजाबाजार, गुलमंडी, छावणी, मानाच्या समजल्या जाणाऱ्या प्रमुख गणेश मंडळांनी साधेपणाने हा सण साजरा करण्याचे ठरविले. काही निवडक गणेशमंडळांनी उत्साह दाखविला. ढोल ताशांच्या गजरात, फुलांची उधळणही काही मिरवणुकीवर करण्यात आली. मोरया, मोरया गजरात आज दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात गणपतीचे स्वागत करण्यात आले.

Story img Loader