‘‘आयआयएम’, ‘एम्स’, ‘साई’ यासह महत्त्वाच्या संस्था नागपूरकडे गेल्या. पायाभूत विकासाच्या सर्व सुविधा विदर्भात नेल्या जात आहेत. असे करत शेवटच्या वर्षांत स्वतंत्र विदर्भ करायचा, असा प्रयत्न आहे. सगळेच तिकडे न्यायचे तर मराठवाडय़ाला काय,’ असा प्रश्न खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या समोर उपस्थित केला. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या बैठकीत राजकीय भूमिका बाजूला ठेवली असल्याचे सांगत खासदार खैरे यांनी भाजपच्या नेत्यांना अडचणीत आणले.  स्वामी रामानंद तीर्थ प्रशिक्षण संस्थेत आयोजित पाण्याविषयीच्या बैठकीत खासदार खैरे तसे उशिरा पोहोचले. खासदार खैरे यांनी भाजपच्या नेत्यांना सुनावले. यावर भाष्य करताना  पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘उठून उभे राहिल्यावर माणूस जरा आक्रमक होतो, त्यामुळे बसूनच बोलते’. खैरे यांनी उभे राहून भाषण केले होते, त्याचा संदर्भ या वाक्याला होता.