औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धारशिव असं नामांतर करण्यास कोणतीही हरकत नाही, असं पत्र केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राज्य सरकारला पाठवलं होतं. त्यानंतर राज्य सरकारने दोन्ही शहरांची नावं बदलण्याची अधिसूचना जारी केली आहे. आता औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादला धारशिव, असं ओळखलं जाणार आहे. या नामांतराविरोधात खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण सुरु केलं आहे.
तेव्हा ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, “एका शहराचं नाव देऊन मला मोठं करा, असं छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं होतं का? महापुरुषांचा आदर करतो, त्यात दुमत नाही. पण, त्यांचं नाव घेऊन राजकारण सुरु आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगाबादशी काय संबंध आहे? त्यांचा जन्म किंवा मृत्यू येथे झाला होता का? त्यांनी येथे काही काम केलं होतं का? किंवा त्यांचं स्मारक आहे?,” असं सवास जलील यांनी उपस्थित केले आहेत.
हेही वाचा : बेळगावबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी केली दिलगिरी व्यक्त; म्हणाले…
“ज्या लोकांनी औरंगाबादमध्ये जन्म घेतला आहे, त्यांच्या…”
“तीस वर्षापूर्वी एका पक्षाचे मोठे नेते येथे येऊन म्हणतात, मला या शहराचं नाव संभाजीनगर ठेवायचं आहे. त्यांची भावना विचारात घेऊन हा निर्णय घेतला जातो. तर, मी येथून निवडून आलेला खासदार आहे. ज्या लोकांनी औरंगाबादमध्ये जन्म घेतला आहे, त्यांच्या भावना नाहीत का?,” असं जलील यांनी म्हटलं आहे.
“मी संभाजी महाराजांचा विरोध करत असून, औरंगाजेबचं…”
तुम्हाला औरंगाजेबचा पुळका का? असं विचारलं असता जलील यांनी सांगितलं, “औरंगाजेबचा जन्मोत्सव किंवा पुण्यतिथी आम्ही साजरी करतो का? ते एक राजा होते. तरीसुद्धा काही लोकं सांगत आहेत, की मी संभाजी महाराजांचा विरोध करत असून, औरंगाजेबचं अनुकरण करतो. मात्र, तसं काही नाही,” असं स्पष्टीकरण जलील यांनी दिलं.
“मनसेला जास्त महत्व देत नसल्याने त्यांना…”
नामकरण पटलं नसेल राजीनामा द्या, असं मनसेनं म्हटलं आहे. याबद्दल विचारलं असता, जलील म्हणाले, “मनसेला जास्त महत्व देत नसल्याने त्यांना उत्तर देणार नाही. तुमच्यात हिंमत असेल तर पक्षाच्या सर्वेसर्वांना औरंगाबादमधून निवडणूक लढण्यास सांगावं,” असं आव्हान जलील यांनी राज ठाकरेंना दिलं आहे.