शरद पवार यांचा पंतप्रधानांना सवाल; प्रशासकीय यंत्रणांचे मनोधैर्य खचल्याची टीका

केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागातील सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या वेळी कोणता निकष लावला होता, याचे स्पष्टीकरण द्यायला हवे. तसेच सरकार रात्रंदिवस काम करत आहे, असे दाखवत त्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती अर्थमंत्र्यांनी सांगितली. वास्तविक हा विभाग पंतप्रधानांच्या अखत्यारित येतो. शेजारच्या गुजरात राज्यातील अधिकाऱ्यांची निवड करताना ती कोणत्या निकषाच्या आधारावर केली गेली, हे सांगावे लागेल. प्रशासकीय यंत्रणेचे मनोधैर्य खचलेले असल्याचे दुर्दैवी उदाहरण दिसून येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.

मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्याने त्यांनी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागात ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे, त्यांच्याविषयी त्यांना पूर्ण माहिती असेलच. तरीही ती नेमणूक झाली. त्यामुळे हे अधिकारी निवडताना कोणते निकष लावले गेले, याचे स्पष्टीकरण द्यायला हवे. राफेल प्रकरणातील कागदपत्रांच्या आधारे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीचा मसुदा आपण वाचला होता. मात्र, या अनुषंगाने केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागात तपास झाला आहे की नाही, हे माहीत नाही. त्यावर त्यामुळे भाष्य करता येणार नाही, असे सांगत पवार यांनी देशात सुरू असणाऱ्या सीबीआयमधील वादावर भाष्य केले. विकास कोठे गेला आहे, हे त्यांना सांगता येत नाही. ते वारंवार गांधी परिवारांनी राज्य केल्याचे सांगतात. त्यांनी राज्य केले हे खरे. त्यातील बहुतेकांना कारागृहात जावे लागले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्या झाली. या परिवाराचा त्यागही मोठा आहे, असे सांगत पवार यांनी पंतप्रधानांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यावर भाष्य केले.

औरंगाबादची जागा हवी

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील जागावाटपाची चर्चा प्रदेशाध्यक्षांच्या स्तरावर सुरू आहे. मात्र, झालेल्या चर्चेनुसार ४०-४२ जागांमध्ये फारसे मतभेद नाही. काही जागा अदलून बदलून देण्याविषयी चर्चा सुरू आहे. मार्ग निघालाच नाही तर आम्ही दोन्ही पक्षाचे नेते त्यावर बोलू. मात्र, पुण्यासारख्या जागेत आता राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक आहे. तसाच बदल औरंगाबादच्याही जागेबाबत होऊ शकतो. गेल्या अनेक निवडणुकांत या जागेवर काँग्रेस पराभूत होत आहे. या जागेत बदल झालाच तर आमच्याकडेही उमेदवार आहे. आमदार सतीश चव्हाण यांना मी अद्याप विचारले नाही. असे म्हणत पवार यांनी औरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीला हवी आहे, असे स्पष्ट संकेत दिले.

Story img Loader