विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील ४८ मतदारसंघांत दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी (एक काकाची, एक पुतण्याची आणि अर्धी काँग्रेस) यांपैकी एकानेही मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरवला नाही. तरी त्यांना मुस्लिमांची मते हवी आहेत. तुम्ही एकजूट दाखवली म्हणून आता ते ईदगाह मैदानापर्यंत आले आहेत, नव्हे त्यांना तुम्ही तसे करण्यास मजबूर केले आहे, असे म्हणत बाबरीपतन हा गुन्हा केला होता ही बाब मान्य करा, असे आवाहन असदोद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) केला. ते आमखास मैदानावरील सभेत बोलत होते.
नव्याने धर्मनिरपेक्ष झालेल्या उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम मते मागण्यापूर्वी बाबरी मशिदीचे पतन हा गुन्हा होता की नाही, हे स्पष्ट करावे. ही बाब त्यांचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनीही मान्य करावी, असेही ओवेसी म्हणाले. गेली २१ वर्षे ‘खान की बाण’ असा प्रचाराचा केंद्रबिंदू ठेवणारे शिवसेनेचे उमेदवार खैरे एवढे दिवस आपण हिंदुत्ववादी असल्याचे सांगत होते. तेव्हा त्यांच्या एकजुटीमुळे ते आता ईदगाह मैदानावर शुभेच्छा द्यायला आले आहेत. नमाज अदा करणाऱ्या व्यक्ती सुहृदयी असतात, असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यामध्ये पाच वर्षांत झालेला हा बदल पुढे किती जाईल, असा त्यांनी प्रश्न विचारला. अशीच राजकीय समज ठेवून एकजूट ठेवली, तर इम्तियाज जलीलशिवाय अन्य कोणी चेहरा असणार नाही, असे ते म्हणाले.
आणखी वाचा-महाबळेश्वर पाचगणी या पर्यटन स्थळावर मतदानाची शाई दाखवल्यास खाद्यपदार्थांवर सवलत
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना केवळ औरंगाबादच्या जागेवरून जलील निवडून येऊ नये, असे वाटते. त्यासाठी सगळ्यांनी व्यूहरचना केली असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या नावाची खिल्ली उडवत (‘भूमरे झूमरे’) झूम बराबर झूम असेही ते म्हणाले.