उद्योगपतींना कोटय़वधीचे कर्ज देताना बँका कचरत नाहीत, मग शेतकऱ्याला काही लाख रुपयांचे कर्ज देताना का चिंता करतात, अशा शब्दांत बँकर्सना फटकारत दुष्काळ निवारणासाठी निव्वळ पाणी साठा वाढवून भागणार नाही तर पीक पद्धतीतही बदल करावा लागेल. कापूस आणि ऊस सोडून द्या, असे म्हणणे सोपे असते. पण शेतकऱ्यांना कृषी विभागाने पर्याय द्यावा, असे सांगून यापुढे खरीप हंगाम आढावा बठकीत बियाणे आणि खताच्या नियोजनाबरोबरच गावनिहाय सूक्ष्मपणे गटशेतीला चालना देऊन छोटय़ा छोटय़ा प्रक्रिया उद्योगातून शेतकऱ्याला सक्षम करावे लागेल, असे मत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी व्यक्त केले.
बीड येथे कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत कृषी उद्योजकता विकास परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, कृषी अधिकारी रमेश भताने, डॉ. स्मिता खोडके आणि अग्रणी बँकेसह ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना नवलकिशोर राम यांनी प्रशासकीय पातळीवर काम करताना आलेल्या अनुभवातून अत्यंत स्पष्ट आणि महत्त्वपूर्ण विवेचन केले. जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. यापूर्वीही दुष्काळाचा सामना केला असला तरी यंदा शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंतेचा विषय आहे. आत्महत्या केलेल्या अनेक शेतकऱ्यांकडे पाच ते दहा एकपर्यंतची शेती असल्याचे आढळून आल्याने त्यामागे एकटेपणा, निराधार वाटणे आणि नराश्य ही कारणे दिसून येतात. यासाठी शेतकऱ्यांशी संवाद वाढला पाहिजे, त्याला विकासाची आणि संरक्षणाची हमी देणारी व्यवस्था निर्माण करावी लागेल तरच शेतकऱ्यांना विश्वास वाटेल. निव्वळ पाणीसाठा वाढवून सर्वकाही भागणार नाही. पीक पद्धतीतसुद्धा बदल करावा लागेल. प्रत्येक माणसामध्ये नवीन प्रयोग करण्याची क्षमता असते. त्याला चालना द्यावी लागेल. यापुढे खरीप हंगाम बठकीत केवळ बियाणे आणि खत किती लागेल याचे नियोजन करून भागणार नाही तर इतरही बाबतीचे नियोजन करून गटशेतीला प्राधान्य द्यावे लागणार आहे. बँकांकडून शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगासाठी कर्ज देताना कायम चिंता व्यक्त केली जाते, असे म्हणत त्यांनी बँक अधिकाऱ्यांना फटकारले. मोठय़ा उद्योगांकडे दीड कोटी माणसांसाठी रोजगार निर्मिती असून छोटय़ा-छोटय़ा उद्योगांकडे पंधरा कोटी रोजगार निर्मिती झाली आहे. त्यामुळे बँकर्सनी शेतीपूरक उद्योगांना कर्ज देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केले.