औरंगाबाद : बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिमायत बाग परिसरात पोत्यात बांधलेल्या जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना २४ तासातच यश आले. पतीकडून नशा करून सततच्या होणाऱ्या मारहाणीला कंटाळलेल्या पत्नीनेच भावासह कुटुंबीयांच्या मदतीने पतीचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी, मेव्हणा, मेव्हण्याची बायको व त्यांचा मुलगा अशा चौघांना अटक केली. घटनास्थळाच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीत दिसणाऱ्या एका दुचाकीवरून पोलिसांना या प्रकरणातील धागे सापडले.

सुधाकर नारायण चिकटे (वय ४३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. औरंगाबादेतील सांगळे कॉलनीत राहणारे सुधाकर चिकटे मूळचे चिखली तालुक्यातील मतला गावचे रहिवासी होते. या प्रकरणी त्यांची पत्नी आशा चिकटे (वय-४०), मेव्हणा राजेश संतोष मोळवळे, त्यांची पत्नी अलका राजेश मोळवळे व १९ वर्षीय मुलगा युवराज राजेश मोळवळे (तिघेही मूळ रा. गोधरी, ता. चिखली) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या पथकाने खुनाचे धागेदोरे काढून उलगडा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृताचे कुटुंबीय व राजेश मोळवळे हे हिमायतबाग परिसरात एकाच इमारतीत राहात होते. सुधाकर बेरोजगार होता व नशेच्या आहारी गेला होता.

हेही वाचा : विवाहित महिलेसोबतचे प्रेमसबंध जिवावर बेतले, पहिल्या प्रियकराकडून युवकाची हत्या

दारूसाठी पैसे मागण्यावरून वाद झाल्यानंतर रात्री आरोपींनी ठरवून डोक्यात हल्ला करून मारले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्हीत दिसणारी दुचाकी आणि मृताच्या घराच्या भागातील दुचाकी एकच असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रकरणाचा उलगडा झाला.

Story img Loader