छत्रपती संभाजीनगर : राज्यात आतापर्यंत दहा वैद्यकीय महाविद्यालये मंजूर करण्यात आली होती. आता त्यात आखणी एका महाविद्यालयाची भर पडेल व राज्यात ७०० वैद्यकीय जागा वाढविण्यात येतील,असे केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी नड्डा यांनी सांगितले. शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम यंत्रणेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी देशात सुरु असणाऱ्या आरोग्य सुविधांची वाढती आकडेवारी समोर ठेवून सुविधांचा वेग या पुढे चालू ठेवण्यासाठीचे बळ मिळावे म्हणून धोरणकर्ते ठरवताना चुकू नका, असा सल्ला आवर्जून दिला.
चालू वर्षात कर्करोगावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. ज्यामुळे लवकर निदान करण्यासोबतच निदान झाल्यावर ९० टक्के रुग्णांवर ३० दिवसात उपचार सुरू करण्यात आले आहे. याची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आल्याचा दावा नड्डा यांनी केला. नड्डा म्हणाले, आरोग्य सुविधेबाबत केंद्र शासन सर्वंकष धोरण राबवित असून यामध्ये लवकर निदान, उपचार यासोबतच प्रतिबंध या तीन सुत्रांवर काम सुरू आहे. कर्करोग ही प्राधान्याची बाब ठरवून चालू वर्षात २०० डे केअर सेंटर्स उभारली जाणार आहेत. त्यात महाराष्ट्रातही अनेक केंद्र असतील. तसेच आरोग्य सुविधेचा घटक असणाऱ्या नर्सिंगबाबतही धोरण ठरविले असून देशात नवीन १०० परिचारिका महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत.
टु बीम व्यवस्थेमुळे अधिक चांगल्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. कर्करोग झालेल्या रुग्णाचे संपूर्ण घर त्याच्या धसक्याने खचून जाते. अशा सर्वाना यातून खंबीर आधार देता येणार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जात आहेत. ७८० वैद्यकीय महाविद्यालये आज देशात आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. निधी कमी पडत नाही, फक्त धोरणकर्ते निवडताना चूक करू नका, अन्यथा नंतर हळहळ व्यक्त करुन उपयोग नसतो. राज्यातील आरोग्य यंत्रणाच्या विविध सहा प्रस्तावांसाठी पाच हजार १३६ कोटी रुपयांची निधी मागणी आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयास ‘ एम्स’ चा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. या कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, खा. सांदिपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, संजय केणेकर, नारायण कुचे, अनुराधा चव्हाण, संजना जाधव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकिय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, राज्य कर्करोग संस्थेचे सल्लागार डॉ.कैलास शर्मा, राज्य कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजीनगर येथे ट्रू बीम सारखी कर्करोगावरील उपचारासाठी अद्यावत सुविधा उपलब्ध होत आहे, याचे समाधान आहे. राज्यात शासकीय आरोग्य व्यवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथे पहिल्यांदा ही अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होत आहे. जीवन पद्धतीत झालेल्या बदलांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. कर्करोगावरील उपचारासाठी रेडिएशन, कीमोथेरेपी यासारखी पद्धती वापरली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. ट्रु बीम सारख्या अद्यावत यंत्रामुळे ज्या भागात संक्रमण आहे, त्याच भागात नेमकेपणाने रेडिएशनद्वारे उपचार करणे शक्य झाले आहे. या उपचारासाठी राज्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे जावे लागत होते, देशभरातून तिथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने टाटा मेमोरियल हॉस्पिटलवर मोठा भार आहे. मात्र आता छत्रपती संभाजीनगर येथे ही सेवा उपलब्ध झाली असून मराठवाड्यातील तसेच लगतच्या जिल्ह्यातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी ही सुविधा वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.