दुष्काळाची तीव्रता मुंबई, दिल्लीत बसून कळणार नाही. शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेऊन समाजाने आपली संपूर्ण ताकद शेतकऱ्यांच्या पाठीशी लावण्याची गरज आहे, असे प्रतिपादन किसान संवेदना यात्रेचे प्रमुख प्रा. योगेंद्र यादव यांनी केले.
आपल्याला भूकंप किंवा अन्य आपत्ती दिसते, पण दुष्काळ दिसत नाही. तो अदृश्य असतो. अशा वेळी समाज, देश आणि सरकार अशा सर्व घटकांनी मिळून एकत्र येण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेत हे दु:ख दूर करण्यासाठी सर्वानीच पुढे आले पाहिजे. शेतकऱ्यांच्या दु:खाशी आपले नाते आहे, असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. आज देशातील ५० कोटी लोक दुष्काळामुळे होरपळत आहेत. हा आकडा साधासुधा नाही. एखाद्या ‘मर्डर केस’ची बातमी आपण वारंवार दाखवतो. दिल्लीत डेंग्यू पसरल्याची बातमी देशभर होते. राजकीय नेत्यांच्या बातम्या माध्यमाद्वारे दाखवल्या जातात, पण याच माध्यमांनी कुठेतरी शेतकरी संकटात आहे आणि तो मरतोय हेसुद्धा दाखवले पाहिजे, असे यादव म्हणाले.
मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यास आलेल्या प्रा. यादव यांनी सोमवारी पालम येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. सुभाष लोमटे, प्रा. विजय दिवाण, ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी, हर्ष मंदर, अनिलकुमार मौर्य, मनीषकुमार, डी. एस. शारदा, डॉ. अमोलसिंग, साथी रामराव जाधव, भाऊसाहेब भोसले आदी उपस्थित होते.
आपण शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेण्यासाठी आलो आहोत. तुमचे ऐकण्यासाठी आलो आहोत, बोलण्यासाठी नाही. भाषणबाजीसाठी खूप लोक आहेत आणि त्यातून देशाचे कोणतेही कल्याण होत नाही. संवेदना यात्रा शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेण्यासाठी आहे. देशातील किमान ५० कोटी जनता आज दुष्काळाचा सामना करीत असून, सरकार मात्र या विषयावर गंभीर नाही, असा आरोप यादव यांनी केला.
तेलंगणा, कर्नाटकातील शेतकऱ्यांशीही आपण संवाद साधला असून कितीही आपत्ती आली तरीही शेतकऱ्यांनी आपला आत्मविश्वास गमावू नये, खचून जाऊ नये असे आवाहन यादव यांनी केले. पालम येथील शेतकऱ्यांनी यादव यांच्यासमोर आपले प्रश्न मांडले. या वेळी भाऊसाहेब भोसले यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. तेलंगणा, कर्नाटक या ठिकाणच्या शेतकऱ्यांपेक्षाही मराठवाडय़ातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट असल्याचे ते म्हणाले.
‘मराठवाडय़ाच्या कोरडय़ा दुष्काळावर
मुख्यमंत्र्यांना उपाययोजना सुचविणार’
वार्ताहर, नांदेड
देशाच्या ४० टक्के भागात कोरडा दुष्काळ पडला आहे. सुमारे ५० कोटी जनतेला दुष्काळाने ग्रासले असून २५ कोटी शेतकरी हैराण आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडात कोरडय़ा दुष्काळाचे सर्वाधिक गंभीर सावट आहे. दोन्ही ठिकाणचे दु:ख सारखेच आहे, ते जोडण्यासाठी गांधीजयंतीपासून संवेदना यात्रा सुरू केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून येथील परिस्थिती पाहून उपाययोजना सुचविणार आहोत, असे सामाजिक कार्यकर्ते प्रा. योगेंद्र यादव यांनी सोमवारी येथे सांगितले.
प्रा. यादव यांचा सहभाग असलेली संवेदना यात्रा सोमवारी मराठवाडय़ातील पालम (जिल्हा परभणी) येथून सुरू झाली. रविवारी रात्री नांदेड जिल्ह्य़ातील देगाव (तालुका नायगाव) येथे यादव यांनी मुक्काम केला. सकाळी नांदेडहून ते पालमला रवाना झाले. प्रा. यादव म्हणाले की, भूकंप आणि पूर या नैसर्गिक आपत्ती आणि त्यामुळे झालेले नुकसान दिसते; परंतु कोरडा दुष्काळ ही अदृश्य नैसर्गिक आपत्ती आहे. कोरडय़ा दुष्काळाने लोक कमालीचे हैराण आहेत. शेतातील पीक वाया गेलेच; परंतु कर्ज, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न कायम आहे. माध्यमांतून कोरडय़ा दुष्काळाचे चित्र व त्याचे परिणाम अजून देशापुढे आले नाहीत, येत नाहीत; परंतु आपण या १४ दिवसांच्या यात्रेनंतर दुष्काळाची वस्तुनिष्ठ माहिती आवश्यक त्या सर्व घटकांपर्यंत पोहोचविणार आहोत. येत्या १५ ऑक्टोबरला या यात्रेचा दक्षिण हरियाणात समारोप होईल.
कोरडय़ा दुष्काळाचे हे संकट आफ्रिका किंवा देशाबाहेरील अन्य कुठे नाही तर आपल्याच देशात आहे. अशा वेळी समस्त देशवासीयांनी एकत्र येऊन या आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांमागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. आपण एकटे आहोत आणि आपले कोणी नाही, अशी भावना शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होणार नाही, या बाबत प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. राजकारण्यांनीही पक्षभेद, विचारभेद विसरून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राथमिकता दिली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राचा दौरा झाल्यानंतर येथील मुख्यमंत्र्यांना आपण सविस्तर पत्र लिहिणार असून मराठवाडय़ात दुष्काळाचे काय चित्र आहे आणि यामुळे उद्भवलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, हे सुचविणार असल्याचे प्रा. यादव यांनी सांगितले.
‘नाना पाटेकरांचे कार्य अभिनंदनीय’
अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळाच्या दु:खावर फुंकर घालण्यास पुढाकार घेतला, ही बाब अभिनंदनीय आहे. त्यांच्यामुळेच मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्तांचे दु:ख देशाला कळाले. कर्नाटक, तेलंगणा किंवा बुंदेलखंडाकडे असे नाना पाटेकर नाहीत, ही उणीव भरून निघण्याची गरज असल्याचे प्रा. यादव यांनी सांगितले.

Story img Loader