मराठवाडय़ातील तीव्र दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर हा भाग पहिल्यांदा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा आणि वेगवेगळ्या उपाययोजना तातडीने व धोरणात्मक पातळीवर सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे मत संवेदना यात्रेचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त करत रोजगार हमी आणि धान्य वितरणातील दोषांवर बोट ठेवले आहे.
स्थलांतर व उपासमार टाळण्यासाठी मजुरांना जॉब कार्ड नसेल तर ते उपलब्ध करून द्यावे. जे मजूर काम करतात त्यांना दर आठवडय़ाला मजुरी द्यायला हवी. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत सुरू असणारा भ्रष्टाचार थांबवायला हवा, अशी सूचना त्यांनी केली. माणसी ५ किलोऐवजी १० किलो धान्य अन्नसुरक्षेचा भाग म्हणून देण्यात यावा. दुष्काग्रस्त भागातील पाणी काही काळ थांबवून ते पिण्यासाठी वापरले जावे, असे धोरण ठरविण्याची विनंती त्यांनी केली आहे. खरीप हंगाम हातचा गेल्याने बागायती जमिनीसाठी प्रति एकर २० हजार रुपये तर कोरडवाहू जमिनीसाठी प्रति हेक्टर १५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना वाचविण्यासाठी चाऱ्याचा पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी एका पत्राद्वारे केली आहे. संवेदना यात्रेदरम्यान अनेक शेतकऱ्यांबरोबर केलेल्या चर्चेनंतर अपेक्षाभंग झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातील जनतेचे हाल होत असून दु:ख आणि चिंता दिसून आली. त्यातून निर्माण झालेली निराशाही सर्वत्र होती, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. रोजगार हमीची नितांत गरज असतानाही त्या योजनेचा लवलेशही ग्रामीण भागात आढळून आला नाही, असे त्यांनी पत्रात नमूद केलेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा