छत्रपती संभाजीनगर – बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने ऐन महिला दिनीच अलिकडेच ओळख झालेल्या एका २५ तरुणीला महिला दिनानिमित्त कार्यक्रम असल्याचे सांगून व त्यासाठी बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पाटोदा ठाण्यात पोलीस कर्मचारी उद्धव गडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली.

पीडित तरुणी ही गेवराई तालुक्यातील असून, घटनेच्या दिवशी ती पुण्यातून पाटोद्यात आली होती. महिला दिनाचा कार्यक्रम असून, त्यासाठी तू ये असे फोनवर बोलून पीडितेला गडकरने बोलावून घेतले होते. पीडिता पाटोद्यात आल्यानंतर तिला दुचाकीवर बसवून एका राष्ट्रीय बँकेजवळच्या घरात नेण्यात आले. तेथे कार्यक्रमाचे कुठलेही दृश्य नव्हते. त्या घरात गेल्यानंतर गडकरने चाळे करण्यास सुरुवात केली. पीडितेला गडकरचा हेतू लक्षात आल्यानंतर तिने ओरडण्याचा प्रयत्न केला. मात्र गडकरने चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. दुपारी १ वाजता पीडितेने पाटोदा पोलीस ठाणे गाठले. तेथून सायंकाळी पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.

Story img Loader