लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : वाल्मीक कराड व धनंजय मुंडेंविरोधातील बातम्या, चित्रफिती का पाहतो, असे विचारत एका तरुणाला दोघांनी कोयता व लोखंडी गजाने मारहाण करून तुझा संतोष देशमुख करतो, अशी धमकी देणारे आरोपी वैजनाथ भारत बांगर व अभिषेक सिध्देश्वर सानप या दोघांना पोलिसांनी कर्नाटकातून ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

या दोघांनी धारूर तालुक्यातील तळनेर येथील होमगार्ड असलेला तरुण अशोक शंकर मोहिते याच्यावर लोखंडी रॉड व कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर मोहितेला सुरुवातीला अंबाजोगाई व त्यानंतर लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. बुधवारी दुपारी हल्ला करून आरोपी पसार झाले होते.

या प्रकरणी जखमी अशोक मोहितेचा मावस भाऊ बाळासाहेब भोसले यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात वैजनाथ भारत बांगर व अभिषेक सिध्देश्वर सानप, या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती धारूरचे पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी दिली होती. या प्रकरणातील तक्रारीनुसार बांगर आणि सानपने अशोक मोहितेला मारहाण करून तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकीही दिली होती.

Story img Loader