विशिष्ट आजारांमध्ये काही गोष्टी करणं आणि काही गोष्टी टाळणं आवश्यक असतं, पण नेमकं काय करायचं आणि काय टाळायचं ते आपल्याला माहीत असतंच असं नाही. म्हणूनच आपल्याला माहीत असायलाच हव्यात अशा काही गोष्टी..
* मलावरोध, खडा होणे, कृशता, मलप्रवृत्तीला वेळ लागणे
पथ्य : पहाटे रुचीप्रमाणे गार वा कोमट पाणी पिणे. चिंचेच्या कोळाचे पाणी व किंचित मीठयुक्त मिश्रणांत उकळून तयार केलेले गोडे तेल पहाटे व सायंकाळी घेणे. तांदळाची जिरेयुक्त पेज, मुगाचे कढण; कृश व्यक्तीकरिता रात्रौ गरम दूध व तूप. तांदूळ किंवा ज्वारीच्या पिठाची भाकरी, रात्रौ मुगाची उसळ; कृश माणसाने चवळी, हरभरा, मूग, तूर, मसूर, टरफलासकट कडधान्ये रुचीप्रमाणे खावी. त्यासोबत लसूण, आले असे वातानुलोमन करणारे पदार्थ असावे. एरंडेल तेलाची चपाती, सातूचे पीठ गूळमिश्रित.
पालक, राजगिरा, तांबडा माठ, मेथी, चवळी अशा निवडक पालेभाज्या व सोबत मूगडाळ. दुधीभोपळा, पडवळ, दोडका, घोसाळे, काटेरी वांगी, परवल, टिंडा, भेंडी, काकडी, वेलची केळे, जुन्या बाराचे मोसंब, अंजीर, गोड द्राक्षे. काळ्या मनुका, जरदाळू, सुके अंजीर, प्रकृतिपरत्वे शेंगदाणे, स्वच्छ धुतलेला खजूर. पहाटे व रात्रौ जेवणानंतर किमान वीस मिनिटे फिरून येणे. वेळेवर जेवण, थोडी भूक ठेवून भोजन करणे. माफक व्यायाम, सूर्यनमस्कार, पश्चिमोत्तासन, सर्वागासन.
कुपथ्य : चहा, कॉफी, खराब पाणी, उगाचच गरम पेये किंवा फाजील कोल्ड्रिंक पिणे; म्हशीचे कसदार दूध. गहू व गव्हाचे इतर पदार्थ, नवीन तांदूळ, वाटाणा, हरभरा, मटकी, उडीद यांचे कच्चे किंवा फार न शिजवलेले पदार्थ. मुळा, अळू, शेपू, बटाटा, रताळे, गाजर, कोबी, गवार. हिरव्या सालीचे केळे, अननस, पपई, सफरचंद, संत्रे, जांभूळ. बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू, खसखस, कोरडे खोबरे, फार मसालायुक्त मांसाहार, फरसाण, मिठाई, बेकरीचे व खूप डालडायुक्त पदार्थ, आंबवलेले पदार्थ, व्हिनेगर शिरका, तंबाखूचे विविध प्रकार व मद्यपान. फाजील श्रम, विश्रांतीचा अभाव, बैठे काम, जागरण, चिंता, लांबचा प्रवास, वाहनावर खूप काळ बैठक.
* मलावरोध, आमांश, चिकट मलप्रवृत्ती, भूक नसणे, आमवात
पथ्य : गरम पाणी, सुंठयुक्त पाणी, पातळ ताक. ज्वारीची किंवा तांदळाच्या पिठाची भाकरी, मूग, मुगाची डाळ, जुना तांदूळ, सातू. उकडलेल्या पालेभाज्या, सर्व फळभाज्या (बटाटा, रताळे सोडून), पपई, गोड द्राक्षे, वाफारून सफरचंद, ताडफळ, काळ्या मनुका.
भूक ठेवून, ठरवून दोन घास कमी जेवणे. जमले तर रात्रौ लंघन करणे. रात्रौ जेवणानंतर कटाक्षाने फिरून येणे. सायंकाळी लवकर भोजन करणे. वेळेवर झोपणे. भूक नसताना जेवण.
कुपथ्य : चहा, कॉफी व इतर फाजील पेयपान, कोल्ड्रिंक, खराब पाणी. गहू व गव्हाचे जड पदार्थ, वाटाणा, हरभरा, चवळी, उडीद, मटकी, साबूदाणा, वरई. कोबी, बटाटा, रताळे.
बदाम, बेदाणा, अक्रोड, काजू, खसखस, शेंगदाणे, पोहे, चुरमुरे, भणंग, बेकरीचे पदार्थ, आंबलेले व खूप तळलेले पदार्थ, फरसाण, डालडायुक्त मिठाई, अंडी, मांसाहार. मसाले पदार्थाचा फाजील वापर. (हिंग, लसूण, सुंठ इ.) परान्न.
फाजील श्रम, दुपारी झोप, रात्रौ जागरण, जेवणावर जेवण, व्यायामाचा अभाव, बैठे काम, मद्यपान, धूम्रपान, मशेरी, तंबाखू.
* मलावरोध, जंत, पोटदुखी, कृमी, आमांश, पक्वाशय विकार, शूल
पथ्य : उकळलेले, शिळे नसलेले पाणी, सुंठपाणी, ताजे ताक व मिरेपूड, लिंबू व गरम पाणी, शेळीचे दूध, कमळे भरपूर असलेल्या जलाशयातील पाणी, शरद ॠतूतील पावसाचे पाणी.
सर्व धान्ये व कडधान्ये वाजवी प्रमाणात. शक्यतो ज्वारी व मूग जास्त वापरावे. गहू टाळावा. सातू, नाचणी, भाकरी. भुकेपेक्षा दोन घास कमी जेवावे. सायंकाळी लवकर जेवण. कार्ले, शेवगा, शेपू, मुळा, डिंगऱ्या, पुदिना, आले, लसूण, काटेरी वांगी, शेवगा पाने, सुरण, पालेभाज्या स्वच्छ धुऊन घेणे. अननस, पपई, गोड संत्रे, ताडफळ आवळा, बडीशेप, जिरे, मिरी, दालचिनी, लवंग, अगोड जेवण.
सकाळी व रात्रौ जेवणानंतर किमान अर्धा तास फिरणे. माफक व्यायाम. वेळेवर झोप.
कुपथ्य : शंकास्पद, शिळे, साचलेले, बोअरवेलचे, पहिल्या पावसातील तसेच तलावातील पाणी. उन्हाळ्यात आटलेल्या जलाशयांतील पाणी.
गव्हाचा फाजील वापर, उडीद, वाटाणा, हरभरा, मटकी यांचा आवश्यकतेपेक्षा जास्त वा सातत्याने वापर. शिळ्या फळभाज्या, काळजीपूर्वक न धुतलेल्या, नुसत्या पाण्यात बुचकळून, गड्डी चिरलेल्या पालेभाज्या. शिळी जास्त झालेली, आंबूस चवीची फळे; हिरव्या सालीची आतून न पिकलेली केळी, साखर व गुळाचा अतिरेकी वापर. फरसाण, मिठाई, शंकास्पद व शिळा खवा असलेले पेढा-बर्फी, खूप डालडायुक्त पदार्थ, केक, खारी बिस्किटे, चॉकलेट, रस्त्यावरील उघडे राहिलेले पदार्थ, हातगाडीवरची कापलेली फळे, पाणीपुरी, उसाचा रस, भेळपुरी, मिसळ इ. आंबवलेले पदार्थ. शिळे व शंकास्पद मांस, चिकन, मासे व अंडी.
दुपारी झोप, रात्रौ जागरण, घाईघाईने जेवण, जेवणावर जेवण, नीट न चावता पदार्थ गिळणे. बैठे काम, व्यायामाचा अभाव, मद्यपान, धूम्रपान.
* हर्निया, आंत्रवृद्धी, आंत्रशोथ, पच्यामानाशय व पक्वाशयाचे, विकार, उदरवात, मलावरोध, पौरुषग्रंथीविकार, वेगावरोधजन्य विकार
पथ्य : उकळून गार केलेले ताजे पाणी किंवा गरम पाणी, सुंठपाणी, एरंडेल तेल, आलेलसूणसिद्ध गरम ताक, बिनसायीचे गाईचे दूध, गरम पाण्यात लिंबू सरबत, कोकम सरबत.
ज्वारी, बाजरी, मूग, तूर, मसूर, जुना तांदूळ भाजून भात, सुकी चपाती; नाइलाज म्हणून घरी भाजलेला पाव; भाताच्या, राजगिऱ्याच्या किंवा ज्वारीच्या लाह्य़ा, नाचणी, तांदळाची भाकरी, सातू. सर्व भाज्या उकडून, वाफारलेल्या, कमी मसाल्याच्या खाव्या.
वेलची केळे, संत्रे, पपई, वाफारून सफरचंद, ताडफळ, आवळा, गोड द्राक्षे; पक्वाशय विकाराकरिता तारतम्याने अननस. काळ्या मनुका, लसूण, आले, सुंठ, जिरे, मिरी, पुदिना, हिंग इ.
सकाळी माफक व्यायाम, रात्रौ जेवणानंतर वीस मिनिटे फिरणे, रात्रौ वेळेवर झोप, जेवणाच्या नेमक्या वेळा पाळाव्या. दोन घास कमी जेवावे. मलमूत्रवेग वेळच्या वेळी पाळावे. पुरुषांनी दिवसा लंगोट बांधावा. तज्ज्ञांचे मार्गदर्शनाखाली सर्वागासन.
कुपथ्य :
गार पाणी, फ्रिजमधील पदार्थ, कोल्ड्रिंक, फाजील चहा कॉफी किंवा कृत्रिम पेये, दही, ज्यूस, शिळे पाणी, शंकास्पद पाणी, उसाचा रस.
गहू, जड अन्न, मका, नवीन तांदूळ, वाटाणा, हरभरा, उडीद, चवळी, मटकी. बटाटा, कांदा, रताळे, शिळ्या भाज्या, आंबा, चिक्कू, मोसंबी, जांभूळ, टामॅटो, काकडी यांचा फाजील वापर. बेकरी, फरसाण, मिठाई. आंबवलेले, फरमेटेड व अन्य फार पौष्टिक पदार्थ, सुकामेवा, मांसाहार.
फाजील श्रम, ताकदीच्या बाहेर खूप वजन उचलणे, खूप सायकलिंग, जिना चढउतार, खूप बोलणे, मलमूत्र व पोटातील वायूचे वेग अडवणे; तहान नसताना फाजील पाणी पिणे, जागरण, दुपारी झोप, वीर्यक्षीणता होईल असे वागणे. जेवणावर जेवण, भूक नसताना जेवण, शंकास्पद व खूप शिळे अन्न. मद्यपान, धूम्रपान, मशेरी, तंबाखू.
* कावीळ, जलोदर, यकृतशोथ, प्लीहाशोथ, सिऱ्हॉसिस ऑफ दि लिव्हर, यकृताचा कर्करोग
पथ्य : खात्रीचे व उकळलेले ताजे पाणी, पूर्ण खात्री असलेले गाईचे दूध, नारळपाणी, ताजे गोमूत्र, एरंडेल तेल. ज्वारी, बाजरी, सुकी चपाती, नाचणी, सातू, तांदूळ भाजून भात. मूग, तूर, मुगाची डाळ, तांदळाची जिरेयुक्त पेज, एरंडेल तेल चपाती. उकडलेल्या सर्व फळभाज्या, पालेभाज्या, कोरफडीचा गर. रोज एक पान. उसाचे घरी केलेले तुकडे-करवे खाणे. काळ्या मनुका, स्वच्छ धुतलेली गोड द्राक्षे, ऋतुमानानुसार ताजी फळे, डोंगरी आवळा, कोहळा.
पूर्ण विश्रांतीमध्ये झोपून राहणे. मलमूत्रांचे वेग न अडवणे.
कुपथ्य : शंकास्पद पाणी, शिळे पाणी, दही, चहा, कृत्रिम पेये, रस्त्यावरील उसाचा रस व इतर ज्यूस. गहू, उडीद, वाटाणा, हरभरा, मटकी, मसूर, तेलकट-तुपकट पदार्थ, शेंगदाणा, खोबरे, तीळ, बदाम, खसखस, बेकरीचे पदार्थ, शिळे व आंबवलेले पदार्थ, परान्न, भूक नसताना जेवण, शंकास्पद व शिळी फळे, मांसाहार, रस्त्यावरील उघडे अन्न, कलिंगड.
अकारण श्रम, चिंता, तीक्ष्ण-उष्ण पेये, मलमूत्रांचे वेग अडविणे, जागरण, काळजी, दारू बीअर, विविध मद्यपदार्थ, मशेरी, तंबाखू, धूम्रपान, गंडेदोरे, गळ्यातील गवताच्या तुकडय़ांची माळ.
* मूळव्याध, भगंदर, अंतर्गत व्रण, नाकांत व मूत्रेंद्रियावर व्रण
पथ्य : सुरक्षित गार पाणी, ताजे ताक, नारळपाणी, गाईचे किंवा शेळीचे खात्रीचे दूध. ज्वारीची भाकरी, जुना तांदळ भाजून भात, तांदळाची भाकरी, ज्वारी, भात, राजगिरा यांच्या लाह्य, हलके अन्न. मूग, मुगाची डाळ, क्वचित तूरडाळ व नाइलाज म्हणून सुकी चपाती, नाचणी, सातू, भाकरी.
दुध्याभोपळा, सुरण, पडवळ, दोडका, टिंडा, परवल, घोसाळे, राजगिरा, चाकवत, तांबडा माठ, कोथिंबीर, ताडफळ, जुन्या बाराचे मोसंब, वेलची केळे, वाफारून सफरचंद, गोड द्राक्षे, आवळा, मनुका, सुके अंजीर. उकडलेल्या व कमी मसाल्याच्या भाज्या, अळणी जेवण.
सायंकाळी लवकर व कमी जेवण; जेवणानंतर किमान वीस मिनिटे फिरून येणे. रात्रौ लवकर झोपणे. माफक व पचनापुरताच व्यायाम वा हालचाल असावी. कमी वजन उचलावे.
कुपथ्य : फार गरम किंवा दूषित, शंकास्पद पाणी, पावसाळ्याच्या सुरुवातीचे पाणी, साचलेले पाणी, दही, चहा, फाजील पेये, पीयूष किंवा कोल्डड्रिंक, ज्यूस, फ्रिजचे पदार्थ, म्हशीचे दूध.
गहू, हरभरा, वाटाणा, मटकी, चवळी, उडीद, साबुदाणा, वरई, कुळीथ, कांदा, बटाटा, रताळे, शिंगाडा, कोबी, बियांची वांगी, पालक, अळू, मेथी, शेपू, डाळिंब, अननस, हिरव्या सालीची केळी, आंबा, पेरू, काकडी, टोमॅटो, मसालेदार, खूप तिखट पदार्थ, चमचमीत अन्न, फरसाण, मिठाई, आंबवलेले व शिळे अन्न, बेकरीचे पदार्थ, मांसाहार विशेषत: अंडी; पोहे, चुरमुरे, भडंग, फाजील मीठ.
फाजील श्रम, ताकदीबाहेर वजन उचलणे, दुपारी झोप, जागरण, दीर्घकाळचा बसून प्रवास, सतत ड्रायव्हिंग, वेगावरोध, मद्यपान, धूम्रपान.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com