भरपूर लोकसंग्रह, भरपूर फिरणं, भरपूर काम करणाऱ्यांचे स्वत:च्या आहार-विहाराकडे मात्र दुर्लक्ष होतं. त्याचा दुष्परिणाम हळूहळू होत जाऊन मोठं नुकसान होतं. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते.
लवकर उठणे- नेहमीचा दिनक्रम निश्चित असणाऱ्या व ज्यांना फिरती नाही अशांचा दिवस पहाटे ते साडेपाच या वेळेत सुरू झाला तर; शारीरिक तंदुरुस्ती व काही मनन चिंतन, निवांत वाचन याकरिता अत्यंत उपयुक्त ठरतो. आयुर्वेदशास्त्रात ब्राह्म मुहूर्तावर उठावे असे सांगितले तरी त्या हिशेबात, या जमान्यात पहाटे चार वाजता उठणे शक्य किंवा व्यवहार्य नाही. ज्यांच्या दैनंदिन जीवनात रात्रीच्या उशिरा होणाऱ्या बैठका किंवा फिरती आहे, अशांनी उशिरात उशिरा सकाळी साडेसहापर्यंतच झोप घ्यावी. सूर्योदयानंतर झोपणे म्हणजे सूर्य किंवा साक्षात् तेजतत्त्वाकडे पाठ फिरविणे आहे. अशा व्यक्तीत बुद्धिमांद्य येते. बुद्धी तरल राहत नाही. जाडय़ येते.
प्रार्थना- उठल्याबरोबर प्रथम भूमातेला वंदन करून किमान काही वचने म्हटली जावी. चांगल्या वाणीने सुरुवात केलेला दिवस नेहमीच चंगला जातो.
उष:पान- उठल्याबरोबर चुळा भरून एक भांडेभर पाणी उष:पान म्हणून जरूर प्यावे, त्याकरिता रोज रात्री तांब्याच्या भांडय़ात भरून ठेवलेले पाणी अधिक औषधी गुणाचे आहे. ताम्रपत्रातील पाणी प्यायल्यास यकृताचे विकार होत नाहीत. हे विकार असणाऱ्यांनी असे पाणी प्यायल्याने रोग लवकर बरे होतात. आत्मविश्वास गमावलेल्यांनी याच ताम्रपत्रात एक रुद्राक्ष किंवा भद्राक्ष भिजत टाकला व ते पाणी रोज सकाळी प्यायल्यास आठ ते पंधरा दिवसांत आत्मविश्वास परत प्राप्त होतो. साधे पाणी उष:पान म्हणून पिण्याचे मोठे फायदे आहेत. मलावरोध, उदरवात अशा तक्रारी असणाऱ्यांना पोट साफ होण्याची औषधे न घेता सुखाने मलप्रवृत्ती होते. भद्राक्ष तुलनेने खूप स्वस्त आहे.
शौच- शौचाला एकच वेळेस जायला लागून चटकन मलप्रवृत्ती होणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. तसे झाले नाही तरी अकारण दीर्घकाळ बसणे व मलप्रवृत्तीचा बळे वेग निर्माण करणे हानीकारक आहे. दुसऱ्यांदा शौचाला जायला लागणे यात लाज बाळगण्याचे कारण नाही. पुन्हा नवीन वेग येईपर्यंत न्याहरी व स्नान सोडून इतर आवश्यक ते उद्योग करावे. हाताशी पुरेसा वेळ असल्यास किमान १५ ते २० मिनिटे लांबवर फिरून यावे. सकाळीच ‘बेड टी’ घेणे किंवा मशेरी लावून विडी- सिगरेट ओढून मलप्रवृत्तीचा कृत्रिम वेग आणणे वाईट आहे. या सवयी अवश्य टाळाव्यात.
मुखमार्जन- शौच झाल्यानंतर मुखमार्जन करताना डोळ्यांवर गार पाण्याचे हबके मारल्यास दृष्टीकरिता फार हितावह आहे. मुखमार्जन करताना आवश्यक असेल तर साध्या पाण्याच्या भरपूर चुळा भराव्या. त्यामुळे गालांच्या स्नायूंना व्यायाम मिळून दृष्टिदोष वाढत नाही, चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते.
दंतधावन- शहरी राहणी व अमेरिकन संस्कृतीच्या आक्रमणाबरोबर टूथपेस्टचा प्रचार, प्रसार खेडोपाडीसुद्धा कानाकोपऱ्यापर्यंत गेला आहे. बहुतांशी टूथपेस्ट या दातांचे काहीच कल्याण करत नाहीत. दातांचे आरोग्याकरिता कडुनिंब, बाभूळ, करंज, खर अशा वनस्पतींच्या काडय़ा दातवण म्हणून उपयुक्त आहेत हे सर्वानाच माहीत आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी कडुनिंब अंतर्साल, बाभूळ, खर, बकूळ, यांचे सालीचे चूर्ण, हिरडा, बेहडा व आवळकाठी चूर्ण, तसेच हळद, कापूर, तुरटी, अत्यल्प प्रमाणात सैंधव, सर्वाइतके गेरू चूर्ण असे घरगुती दंतमंजन करून वापरावे. या मिश्रणात भाताच्या तुसाची राख वापरण्यास हरकत नाही. मात्र कोळशाचे दंतमंजन दाताकरता नक्कीच हितावह नाही.
गुळण्या व पित्त पाडणे- दंतधावनानंतर साध्या पाण्याच्या गुळण्या किंवा ज्यांना कफाचा त्रास आहे, त्यांनी गरम पाणी व किंचित मीठ घालून गुळण्या करणे चांगले. मात्र गुळण्या करताना मुद्दाम ओकारी काढून कफ काढणे इष्ट नव्हे. काहीजण अकारण मीठ पाणी पिऊन सकाळी उलटी करवतात. त्याची नक्कीच गरज नसते. सकाळी आपण उलटी करावी अशी आपल्या देहाची निसर्गाने रचना केलेली नाही.
सकाळचे फिरणे व व्यायाम- पन्नाशीच्या आसपास, काहींना सकाळी उठल्यापासूनच एक प्रकारचा आळस असतो. त्यामुळे कोणताच व्यायाम करावासा वाटत नाही. कोणत्याही वयात किमान व्यायाम आवश्यक आहे. किमान सहा सूर्यनमस्कार, त्याचबरोबर दोरीच्या उडय़ा, जोर, बैठका हे सहज करता येण्यासारखे व्यायामाचे प्रकार आहेत. ज्यांना काही कारणांनी हे व्यायाम जमणार नाहीत, त्यांनी किमान अर्धातास वा तीन किलोमीटर मोकळ्या हवेत फिरून यावे. येताना पूर्वी पाठातंर केलेली धार्मिक स्तोत्रे किंवा गीता- अध्याय म्हणण्याकडे लक्ष दिले तर वेळ पटकन निघून जातो. असे फिरून येण्यामुळे सकाळी मलप्रवृत्ती साफ न झाल्यास पुन्हा येणाऱ्या मलप्रवृत्तीच्या वेगाला अडवू नये.
न्याहरी- ज्यांना आपले आरोग्य नक्कीच टिकवायचे आहे त्यांनी चहा, कॉफी ही पेये कटाक्षाने वज्र्य करावीत. त्याऐवजी भाकरी, आले, ताक, कढिलिंब पानेयुक्त ज्वारीची उकड, पोळी किंवा कोणत्याही प्रकारचा अल्प आहार शक्यतेनुसार घ्यावा. उष्ण त्रुतूमध्ये सकाळी न्याहरी भरपूर असावी. खूप थंडीच्या काळात सकाळची न्याहरी कमी असली तरी चालते. पावसाळ्यामध्ये न्याहरी टाळून जेवणाच्या वेळात व्यवस्थित जेवलेले चांगले. ज्यांना मानसिक किंवा बौद्धिक काम दिवसभरात भरपूर आहे, अशांनी शतावरी कल्प किंवा किमान साखर असलेला पदार्थ न्याहरीबरोबर अवश्य खावा. काही नाही तर जिरे मिसळून तांदळाची पेज घ्यावी.
अभ्यंग- ज्यांना शारीरिक श्रम, जिन्यांची चढउतार, भरपूर चालणे, वजन उचलणे, ऊठबस अशी नित्याची कामे आहेत आणि ही कामे दीर्घकाळ करावयाची आहेत, त्यांनी किमान हातपाय, कंबर, गुडघे यांचेवर तेलाचा हात फिरवावयास हवा. अभ्यंग किंवा मसाज याचा अर्थ म्हैस रगडणे नसून; हातपायांना खालून वर व मान, पाठ, कंबर यांना गोलाकार हात फिरवून तेल जिरविणे होय. तेल या पद्धतीने जिरविल्यामुळे दर दिवशी होणारी शरीराची झीज भरून येते, रोमरंध्रात साठलेले, दिवसभराच्या श्रमाचे मळ मोकळे होतात, त्यानंतरच्या स्नानाने शरीर उत्साहित होते. अभ्यंगाकरिता ऋतू, उपलब्धता वा सात्म्य याला धरून कोणतेही तेल वापरावे. तेल किंचित् गरम करून वापरणे अधिक चांगले. असे दीर्घकाळ नेटाने मसाज केल्यामुळे म्हातारपण लांब राहते व सर्व प्रकारचे वातविकार बरे होतात. ज्यांना तेलाच्या वासाची अॅलर्जी आहे किंवा तेलकटपणा चालत नाही, त्यांनी आवळा, वेखंड, हळद, अशा विविध चूर्णाच्या मिश्रणाचा कोरडा किंवा उटण्यासारखा दूध पाण्यातून मसाजचा प्रयोग करावा. शक्य असेल तर मसाज वा अभ्यंगानंतर किमान अर्धा तास आंघोळ करू नये.
स्नान- शक्य असेल तर स्नान गार पाण्याचे असावे. ज्यांना कोमट वा गरम पाण्याच्या स्नानाची सवय आहे, त्यांनी डोळे व केस यांचे आरोग्य बिघडू नये म्हणून कटाक्षाने डोक्यावरून गारच पाणी घ्यावे. स्नानाअगोदर चांगले अभ्यंग केले असल्यास गार पाण्याचे स्नान थंडीमध्ये सुद्धा करण्यात काही अडचण येत नाही. सर्दी, पडसे, खोकला, दमा तक्रारींचा इतिहास असणाऱ्यांनी सोसवेल असेच पाणी स्नानाला घ्यावे. डोक्यावरून स्नान करणे, खूप थंडीच्या काळात टाळले तरी चालेल, त्वचाविकारांचा त्रास असताना आंघोळीच्या अगोदर कडुनिंबाची पाने घालून उकळलेले पाणी किंवा गोमूत्र, गोमय कालवून घेतलेले पाणी अंगाला खसखसून लावावे. बाजारात मिळणाऱ्या साबणाऐवजी हरभरा डाळीचे पीठ व दूध वापरावे. तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी दूध, हळद वा दूध आवळाकाठीचे मिश्रण साबणाऐवजी वापरावे. स्नानानंतर केस खसखसून पुसून किमान थोडे तरी तेल डोक्याला अवश्य जिरवावे. दिवसभराच्या मगजमारीकरिता असे थोडे जिरविलेले तेल फार उपयुक्त आहे. जास्वंद, वडाच्या पारंब्या, आवळा, ब्राह्मी, माका, शतावरीमुळ्या, कोरफड, दुर्वा अशा विविध वनस्पतींच्या रसात आवडीनिवडीप्रमाणे तेल सिद्ध करता येते.
नस्य- नाक स्वच्छ असेल तर प्राणवायूची, घशाची, फुप्फुसाची, दृष्टीची अशी शरीराची अनेक कार्ये निर्वेध चालतात. त्याकरिता सकाळी उठल्यावर दोन्ही नाकपुडय़ांत तेलाचे वा तुपाचे दोनचार थेंब अवश्य टाकावे. त्यामुळे नाकाचे मागे असणारे शृंगाटक मर्म मोकळे राहते. मेंदू तल्लखपणे काम करतो.
नेत्रांजन- दृष्टीला कफापासून भय आहे. डोळ्यात चिपडे येणे, डोळे चिकटणे, धुरकट दिसणे या सर्व तक्रारींकरिता तसेच आधुनिक काळाची गरज म्हणून दैनंदिन वाढत्या वाचनाच्या कामात नियमित नेत्रांजनाची फारच गरज आहे. एकेकाळी धातूंपासून तयार केलेला सुरमा, अंजन म्हणून वापरण्याचा प्रघात होता. असे सुरमे कितीही सूक्ष्म असले तरी ते डोळ्याला हानीकारकच आहेत याबद्दल तिळमात्र शंका नाही. त्याकरिता कापूर जाळून तूप चोपडलेल्या तांब्याच्या भांडय़ावर धरलेली काजळी नेत्रांजन म्हणून वापरावी. हे अंजन दृष्टीला सुरक्षित व लाभदायक आहे.
(विशेष सूचना : कानात कदापि तेल टाकू नये)
वाचन- दिवसाचेही काही काळ वाचन हा दैनंदिन जीवनातील आवश्यक भाग आहे. काही ज्ञानी माणसांचे मताप्रमाणे, मानवाच्या शक्तीचा ऱ्हास प्रामुख्याने दोन कारणांनी होतो. डोळ्याने अधिक विषय पहाणे किंवा डोळ्याचा अधिक वापर करणे व तोंडाची कायम टकळी चालविणे. असे जरी असले तरी, दैनंदिन वर्तमानपत्राची वा काही निवडक साप्ताहिके मासिके, धार्मिक ग्रंथ व अन्य महत्त्वाचे वाचन आवश्यक असते. प्रवासात गाडी हालत असताना वाचन करणे, तसेच झोपून वाचन करणे, अतिशय कमी उजेडातील वाचन म्हणजे डोळ्यांच्या टाळता येण्यासारख्या रोगांना आमंत्रण देणे आहे. काहींना अतिमंद उजेडात वाचायची सवय असते. जे वाचावयाचे त्या मजकुरावर पुरेसा उजेड असलाच पाहिजे. त्यामुळे दृष्टीवर ताण पडत नाही. डोळ्याला पाणी येत नाही, डोळे थकत नाहीत, चष्म्याचा नंबर वाढत नाही. वाचन करताना चांगला टाइप असलेले वाचन हे काही वेळेस आपल्या हातात नसते. अशा वेळेस विशेषत: साठ- पासष्ट वयानंतर फालतू वाचन सोडून द्यावे. मोतिबिंदू, ऱ्हस्व दृष्टिदोष, काचबिंदू, दृष्टिपटल सरकणे इ. रोग अपुऱ्या उजेडात व गतिमान प्रवासात वाचन करण्यामुळे नक्कीच होऊ शकतात. ज्यांना थोडेसे वाचन केल्याने थकवा येतो त्यांनी शतावरीच्या मुळ्यांचा काढा किंवा शतावरीकल्प यांचा जरूर वापर करावा. डोळ्यांना पाणी येत असल्यास आवळा, आवळ्याचे चूर्ण, आवळ्याचा रस किंवा च्यवनप्राश प्राशन करावा. जास्त वाचनाने डोळ्यात चिकटा, पाणी, खाज, कंड येत असल्यास थेंबभर ‘मधा’ मध्ये सुरवारी हिरडा उगाळून नियमितपणे मधाचे अंजन करावे. डोळ्यात नुसता मध टाकल्यानेही वाचन अधिक चांगले करता येते. डोळ्यांचा ताण कमी होण्याकरतिा, तुपात तयार केलेले कापराचे अंजन वापरावे.
भाषण- काही लोकांना रोजच्या कामाचा भाग म्हणून भरपूर बोलावयास लागते. काही वेळेस नुसतेच निवेदन करावयाचे असते. तर काही वेळेस मुद्दा पटवून द्यावयाचा असतो. एकदा एक मोठे पदाधिकारी आपल्याला फुप्फुसाचा विकार आहे, हे माहीत असतानाही तावातावाने एक निवेदन करत होते. निवेदन हे काही परिणाम घडविण्याकरिताचे भाषण नव्हते. अहवालात्मक वाचन वा निवेदन किंवा सर्वसामान्य विचार मांडताना शिरा ताणून, बेंबीच्या देठापासून जोर लावून, फुप्फुसावर जोराचा दाब देऊन घसा खरडून आवाज चिरका होईपर्यंत बोलणे कधीच आवश्यक नसते. उर:क्षत, टी.बी., राजयक्ष्मा, क्षय, स्वरभंग, आवाज बसणे, चिडचिडेपणा या सर्व रोगांना ताकदीच्या बाहेर बोलणे असे कारण आहे. खालच्या पट्टीत बोलावयास सुरुवात करून, गरजेप्रमाणे आवाजाचा चढउतार करून बोलावयास हरकत नाही. ज्यांना नियमितपणे व्याख्याने करावयाची आहेत त्यांनी गोडद्राक्षे, मनुका, आवळ्याचे सावलीत वाळविलेले तुकडे किंवा आवळकाठी, ज्येष्ठमधकांडय़ा, खडीसाखर, किंवा सितोपलादि चूर्ण यांचा अवश्य वापर करावा. खूप बोलण्याच्या श्रमामुळे, वारंवार थकवा येत असल्यास कोहळारस, कोहळ्याच्या वडय़ा यासारखे दुसरे पौष्टिक काहीच नाही.
दुपारचे भोजन- खूप फिरणाऱ्यांचे बहुतांशी जेवण नेहमीच त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे वा सूचनेप्रमाणे असेल असा काही भरवसा नसतो. ज्यांना नित्य गावोगाव व नवनवीन ठिकाणी हिंडावे लागते, त्यांना दोन प्रकारे बळी जावे लागते. काही ठिकाणी यजमान लोक आग्रहाने भरभरून वाढतात. मिठाई वा अन्य चमचमीत पदार्थाची रेलचेल असते. याउलट भारतातील लहानसहान खेडेगावात जे मिळेल ते करून किंवा सवय नसलेले पदार्थ तिखट, आंबटाचा अतिरेक याला तोंड द्यावे लागते, भरीसभर म्हणून काही वेळेस दुपारच्या जेवणाअगोदरपासून एक वा अनेक ठिकाणी चहापाणी वा नाष्टापाण्याचा मारा झालेला असतो. पूर्वसूचना मिळाली असेल तर यजमान पथ्यपाणी असलेले जेवण तयार करील, तरीपण पानावर एकदा बसल्यावर, वाढलेले पदार्थ खाल्ल्यावर पुन्हा वाढून न घेणे असा कणखर निर्धार, साठीच्या पुढच्या वयात दाखवावयास हवा. स्थौल्य, मधुमेह, रक्तदाबवृद्धी, हृद्रोग, शोथ, बहुमूत्रता या विकारांनी ग्रस्त असणाऱ्यांनी साखर, भात, बटाटा, रताळे, साबुदाणा, हरभरा, तेले, तूप, मांसाहार, कोल्ं्रिडक्स व खूप मीठ असलेले पदार्थ कटाक्षाने टाळावयास हवेत. रोग वाढवून औषधे घेण्यात काहीच मजा नाही. त्याऐवजी तोंडावर ताबा ठेवणे दुपारच्या जेवणात फार आवश्यक आहे. त्वचेचे विकार, उष्णतेचे विकार असणाऱ्यांनी आंबट, खारट, उष्ण पदार्थ कटाक्षाने टाळावेत. दमा, सर्दी, खोकला हे विकार असणाऱ्यांनी दही, केळे, टोमॅटो, काकडी हे पदार्थ वज्र्य करावेत आमांश ग्रहणी, कोलायटिस हे विकार आहेत; अशांनी साखर, डालडा, बेकरीचे पदार्थ, फरसाण अशा पदार्थापासून लांब रहावे. मग जेवावे काय असा प्रश्न नेहमीच येतो. शक्यतो ज्वारीची भाकरी, सुकी चपाती, माफक भात, बहुतेक सर्व माफक फळभाज्या, पालेभाज्या, गोड ताक व सौम्य तोंडी लावणे असे जेवण मित प्रमाणात असेल तर रोग बळावत नाहीतच, शिवाय दुपारी विश्रांती न घेताही संध्याकाळी उशिरापर्यंत काम करता येते. पोटाचे जाडय़ येत नाही. जे कृश आहेत त्यांनी जेवणाअगोदर किंवा जेवणामध्ये पाणी न घेता जेवणानंतर पाणी प्यावे. स्थूल व्यक्तींनी आहार आपोआप कमी व्हावा म्हणून जेवणाअगोदर ग्लासभर पाणी प्यावे. मूतखडा असणाऱ्यांनी टमाटू, वांगी, पालेभाज्या, दूध, काजू, तीळ, चहा हे पदार्थ टाळावयास हवेतच.
अमेरिकन संस्कृतीचे जबरदस्त आक्रमण सर्वच क्षेत्रांत आहे. त्यामुळे जेवणाअगोदर आइस्क्रीम वा एखादे पेय घेणे असा अजब प्रकार मोठमोठय़ा शहरांत दिसून येतो. सतत बाहेर फिरणाऱ्यांनी आपल्या प्रकृतीकरिता ह्य गोष्टी टाळल्या पाहिजेत. जेवणानंतर काहींना मुखशुद्धी, मुखवास म्हणून सुपारी खावीशी वाटते. सुपारी खाल्ल्यामुळे गालांच्या आतील स्नायूंना इजा पोहचते. सोबत पान, चुना, तंबाखू असल्यास ते आणखी हानीकारक आहे. त्यापेक्षा सुपारी नसलेल्या पुढील पदार्थाचे मिश्रण भोजनोत्तर पचनाचेही काम करते. धनेडाळ, बडीशेप, खोबरे, ओवा, बाळंतशोपा, तीळ हे किंचित शेकून घेऊन सुपारी म्हणून वापरावे. याचप्रकारे सावलीत वाळविलेल्या ताज्या आवळ्याचे तुकडे किंवा आंब्याच्या कोयीतील बाठीचे किंचित मिठाच्या पाण्यात बुडवून सुकविलेले तुकडे तोंडात चघळण्याकरिता उत्तम. ‘च्युईंगम’पेक्षा चांगले काम करतात. वरील सुपारीत वेलची, दालचिनी, खसखस, लवंग माफक प्रमाणात मिसळावे.
भोजनोत्तर वामकुक्षी- काहींना जेवणानंतर थोडय़ा झोपेची फारच आवश्यकता लागते. ज्यांना टाळता येणे शक्य आहे त्यांनी कटाक्षाने दुपारची झोप टाळावी. त्यामुळे आयुष्य निरोगी जाते. आयुष्याची वर्षे वाढतात. विशेषत: हृद्रोग, मधुमेह, स्थौल्य, रक्तदाबवृद्धी, सूज, दमा, खोकला, सर्दी या तक्रारी असणाऱ्यांनी नक्कीच झोपू नये. झोपणे टाळता येण्यासारखे नसल्यास बसून पेंग घ्यावी किंवा पंधरावीस मिनिटे झोप घेऊन गजर लावून उठावे. झोप येऊ नये याकरिता किंचित चहाची पावडर असलेला पातळ चहा नाइलाज म्हणून घेतला व दुपारची झोप टाळता आली तर त्यात नुकसान बिलकूल नाही. सतत वेगवेगळ्या ठिकाणी फिरणाऱ्यांना दुपारच्या चहाची सक्ती बऱ्याच वेळा होते. ती टाळण्याकरिता ‘आत्ताच येताना चहा झालाय’ असे खोटे बोलावयास हकरत नाही. दुपारच्या भोजनानंतर कटाक्षाने सायंकाळपर्यंत काहीही अन्नपदार्थ गेला नाही तर निसर्गाचा कॉल आपोआप व उत्तम प्रकारे येतो. तोंड येणे, त्वचाविकार, मूतखडा, लघवीची आग या विकारांनी ग्रस्त कार्यकर्त्यांनी चहा टाळावाच.
सायंकाळचा व्यायाम- सकाळच्या व्यायामापेक्षा काही वेळेस सायंकाळचा व्यायाम करावयास वेळ मिळत असतो, ज्यांना सकाळी व्यायाम करावयास मिळत नाही, त्यांनी सायंकाळचा व्यायाम करण्याअगोदर किमान पाच ते सहा तास अगोदर काहीही खाल्लेले असू नये, हा व्यायाम जोर, बैठका, दोरीवरच्या उडय़ा किंवा फिरणे या स्वरूपाचा असू शकतो. शक्यतो पोटाची आसने सायंकाळी करू नयेत. सर्वात चांगला व्यायाम मैदानी खेळ खेळणे किंवा त्या वातारणात राहणे हा आहे.
सायंकाळचे वाचन- सायंकाळी व्यायाम झाल्यावर कोणेतही खाणे न करता माफक पाणी गरजेप्रमाणे जरूर प्यावे. सायंकाळचे वाचन सूर्यास्त काळात किंवा संध्याकाळात करणे, आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने डोळ्याला हानीकारक आहे. सायंकाळच्या खेळ व व्यायामानंतर, तसेच दिवसभरच्या श्रमाने एकूण शरीराला थकवा आलेला असतो. अशा वेळेस ताण दिल्यास दृष्टी क्षीण होते तसेच सायंकाळचा उजेड हा मंद व कृत्रिम असतो. मुद्दाम ताण देऊन या काळात वाचणे कटाक्षाने टाळावे.
सांयकाळचे स्नान- खूप घाम येत असलेल्या प्रदेशात किंवा संध्याकाळचा खेळ, व्यायाम, केलेल्यांना स्नानाची गरज असतेच, पण हे स्नान फार काळ लांबवू नये. विशेषत: डोके कटाक्षाने कोरडे ठेवले नाही तर सर्दी, पडसे, खोकला, दमा, डोकेदुखी हे रोग उद्भवतात किंवा बळावतात.
सांयकाळचे भोजन- चाळीस ते साठ वयापर्यंत शरीराला सायंकाळचे जेवण आवश्यक आहे. साठ वयानंतर मात्र सायंकाळचे जेवण कमी करावयास हवे. वयाच्या सत्तरीनंतर सायंकाळी व रात्री न जेवणे याच्यासारखे दुसरे मोठे सुख नाही. रात्री दहानंतर उशिरा जेवणाला मी ‘राक्षसकाली जेवण’ असे म्हणून त्याचा कटाक्षाने निषेध करतो. त्याचे कारण उशिरा जेवल्यामुळे व बाहेर फिरस्तीचे काम असणाऱ्यांना सकाळी लवकर उठावयाचे असल्यास किंवा रात्री प्रवास करावयाचा असल्यास, अन्नपचनास नक्कीच काळ कमी पडतो. व त्यामुळे आम्लपित्त, गॅसेस, पोटदुखी, मलावरोध, दमा, खोकला, वाढता रक्तदाब, हृद्रोग, मधुमेह हे विकार संभवतात किंवा बळावतात. सायंकाळचे जेवण किमान पदार्थाचे असावे. दही, कटाक्षाने वर्ज करावे. ताक, भात, कोशिंबिरी, फ्रिजमधील पदार्थ जरूर टाळावे. मूळव्याध, भगंदर या व्याधी असणाऱ्यांनी कटाक्षाने कमी जेवावे. एखादी भाकरी वा एखादी भाजी एवढेच जेवण साठ वयानंतर पुरेसे असते. काहींना रात्री दूध घेण्याची सवय असते. खडा होणे, गॅसेस, आमांश, चिकटपणा, दमा, खोकला या तक्रारी असणाऱ्यांनी रात्री दूध जरूर टाळावे. भोजनामध्ये मिठाई, तळलेले पदार्थ रात्री खाणे म्हणजे आपले ‘फ्रुटफू ल’ आयुष्य नक्कीच कमी करणे आहे. काहींना भोजनानंतर एखादे आसवारिष्ट किंवा पेय, चूर्ण, गोळ्या घ्यावयाच्ी सवय असते. या सगळ्यांचा विचार पुढे स्वतंत्रपणे केलेला आहे.
रात्री फिरणे- सकाळचे फिरणे एकूण आरोग्याकरिता चांगलेच आहे याबद्दल वाद नाही. पण ज्यांचे विविध वातविकारांनी आरोग्य बिघडले आहे. उदा. गॅसेस, मलावरोध, अपचन, अजीर्ण, मूळव्याध, भगंदर, वायूगोळा, हर्निया इ. अशा व्यक्तींनी रात्री किमान पंधरा ते वीस मिनिटे फिरावयास जावे. ‘शतपावली मी करतो’ असे म्हणणे म्हणजेच स्वत:चीच फसवणूक आहे. किमान दोन अडीच हजार पावले हिंडल्याशिवाय कोणीच झोपू नये असे माझे मत आहे.
रात्रीची औषधी योजना- ऊठसूट तक्रारीकरिता औषधे घ्यावी का न घ्यावीत अशी तात्त्विक चर्चा करण्यापेक्षा संपूर्ण दिवसाच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्य थोडय़ाफार औषधाने घेऊन उपयोग होणार असेल तर रात्री पन्नाशी-साठीनंतर रोग, लक्षणे, वय-प्रकृती, आवड- निवड, उपलब्धता या प्रकारे विचार करून किमान औषध ठरवावे, त्याबरोबर औषधाची सवय लागत नाही ना याकडे लक्ष द्यावे. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे रात्री त्रिफळाचूर्ण घेतल्यास काहीच नुकसान न होता, डोळा, पित्तविकार, त्वचेचे विकार, खाज, पोटातील उष्णता, मधुमेह, कृमी, कफाचे व रक्ताचे विकार या सगळ्यांकरिता श्रेष्ठ रसायन म्हणून उत्तम फायदा होतो. कमी-अधिक मात्रा झाली तरी शारीरिक नुकसान काही होत नाही. सकाळी ‘मॉर्निग कॉल’ एकदाच वेळेवर येणे याला महत्त्व देणे आवश्यक आहे. त्याकरिता त्रिफळाने भागत नसल्यास गंधर्व हरितकी घ्यावी. पोटात गेलेला हिरडा अधिकच त्रास देत नाही, शक्यतो सोनामुखी, इसबगोल, जमालगोटा ही घटकद्रव्ये असणारी औषधे घेऊ नयेत. पोटाच्या अधिक तक्रारीकरिता अभयरिष्ट, यकृताच्या विकाराकरिता कुमारीआसव; हृद्रोगी रुग्णांनी अर्जुनारिष्ट; आमांश, चिकटपणा, याकरिता फलत्रिकादिकाढा; वारंवार मलप्रवृत्ती टाळण्याकरिता कुटजारिष्ट, पोटदुखी, पोटफुगी याकरिता पंचकोलासव तारतम्याने दहा ते पंधरा मि. लि. कोमट पाण्याबरोबर घ्यावे. पोटात खूप गॅस धरणाऱ्यांनी ओवा, मीठ व त्यासोबत सुंठ, मिरे, पिंपळी, असे चूर्ण अधूनमधून घ्यावयास हरकत नाही. आम्लपित्त असणाऱ्यांनी कोणतेही आसवारिष्ट न घेता प्रवाळपंचामृत तीन ते सहा गोळ्या घ्याव्यात.
निद्रा- सुखी माणसाच्या व्याख्येत अंथरूणावर पडल्याबरोबर निद्रा येणे हे प्राधान्याने सांगितलेले लक्षण आहे. दिवसभराच्या श्रमाने, झोपण्यापूर्वी फिरण्याने, शांत झोप यावयास हवी. ती येत नसल्यास तळपाय, कानशिले, कपाळ, यांना हलक्या हातांनी चांगले तूप जिरवावे. तसेच दोन थेंब दोन्ही नाकपुडय़ांत टाकावे. काही विचाराने झोप येत नसल्यास आपल्यासंबंधी असलेले विषय सोडून; आपल्याशी अजिबात संबंध नसलेला एखादा विषय किंवा त्या दिवशी वर्तमानपत्रात वाचलेली बातमी, वृत्त डोळ्यांसमोर आणावे. बहुधा लगेच झोप लागते. एवढे करूनही ज्यांना झोप लागत नाही, त्यांनी पुढील उपाय करून पाहावेत.
कृश व्यक्तींनी कपभर म्हशीचे दूध प्यावे. सोबत आस्कंदचूर्ण अर्धा- एक चमचा घ्यावे. मगजमारी असणाऱ्यांनी जटामांसी चूर्ण चिमूटभर, किंचित साखर मिसळून घ्यावे. खूप वृद्ध व्यक्तीने धमासा चूर्ण व साखर एक चमचा, कोमट पाण्याबरोबर घ्यावे.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com