Ola electric: ओला इलेक्ट्रिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता ही चर्चा कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरमुळे नाही. तर, कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्यामुळे चर्चेत आला आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर बुकिंगच्या वेळी हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. सायबर ठगांनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर बुक करण्याच्या नावावर अनेक ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ओला इलेक्ट्रिक स्कूटर घोटाळ्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २० आरोपींना अटक केली आहे. हे लोक ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी बनावट वेबसाइट तयार करून लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यातून एक हजारांहून अधिक लोक फसवणुकीचे बळी ठरले आहेत. अहवालानुसार, वेबसाईटवर बुकिंग होऊन खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांनी ग्राहकांना सेवा दिली नाही. अशाप्रकारे त्यांनी ५ कोटींहून अधिकची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

आणखी वाचा : अखेर BYDने जाहीर केली भारतातील ‘SUV BYD Atto 3’ ची किंमत; SUV मध्ये मिळेल एका चार्जमध्ये ५२१ किमीची रेंज

अशाप्रकारे केली जात होती फसवणूक

प्राप्त माहितीनुसार, बंगळुरूमध्ये राहणाऱ्या दोन आरोपींनी ओला कंपनीची एक बनावट वेबसाईट तयार केली होती. ज्याद्वारे वेबसाईटवर व्हिजीट करणाऱ्या ग्राहकांना हे ठग आपल्या जाळ्यात ओढत होते. जेव्हा हे ग्राहक ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी गुगलवर सर्च करत होते तेव्हा त्यांना ओला इलेक्ट्रिकची बनावट वेबसाईट दिसत होती. यानंतर हे ठग ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकण्याच्या नावावर लोकांकडून पैसे जमा करून घेत होते.

ग्राहक जेव्हा ही बनावट वेबसाईट ओपन करून त्यांचे डिटेल्स भरत होते. तेव्हा बंगळुरूत बसलेले दोन ठग ग्राहकांची माहिती आणि त्यांचे मोबाईल नंबर इतर राज्यांमध्ये बसलेल्या त्यांच्या गँगमधील इतर सहकाऱ्यांना देत होते. त्यानंतर ठग त्या ग्राहकांना फोन करून ओला स्कूटर बुक करण्यासाठी ४९९ रुपये बुकिंग अमाऊंट म्हणून ट्रान्सफर करण्यास सांगत होते. ग्राहकाने ४९९ रुपये ट्रान्सफर केल्यानंतर ग्राहकाकडून स्कूटरचा विमा, टॅक्स आणि ट्रान्सपोर्टेशन चार्जेसच्या नावाखाली ५०,००० रुपये ते ७०,००० रुपये वसूल करत होते. अशा प्रकारे या ठगांनी जवळपास १,००० ग्राहकांकडून ५ कोटी रुपये मिळवले आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपी हे देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बसून ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होते. या आरोपींना बेंगळुरू, गुरुग्राम आणि पाटणासह देशभरातील विविध शहरांमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 accused arrested in ola electric scooter scam pdb