कारप्रेमींमध्ये कायमच बीएमडब्ल्यूच्या गाड्यांबाबत उत्सुकता असते. नविन गाडी लाँच होणार म्हटलं की, त्यात काय नवं असेल याबाबत चर्चा सुरु होते. कंपनी नव्या 2022 BMW X4 फेसलिफ्ट एसयूव्हीचा टीझर सोशल मीडियावर रिलीज केला आहे. 2022 X3 फेसलिफ्ट एसयूव्ही लाँच केल्यानंतर ही दुसरी गाडी असणार आहे. 2022 BMW X4 फेसलिफ्ट एसयूव्ही १० मार्चला लाँच होणार आहे. जर्मन कार उत्पादक कंपनीने याबाबतची अधिकृत घोषणा आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून केली आहे. याआधी कंपनीने या कारची प्री बुकींक सुरु केली आहे. ५० हजार रुपये भरून गाडीची नोंद करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून गाडीची नोंद करू शकतात. X4 च्या जुन्या मॉडेलची किंमत ६७.५० लाख (एक्श शोरूम) इतही आहे. त्यामुळे 2022 X4 Facelift एसयूव्हीची किंमत ७० लाखांच्या आसपास असू शकते. बीएमडब्ल्यूची स्पर्धा मर्सिडिज बेन्झ जीएलसी कुपसोबत असणार आहे.
क्रॉसओवर-कूप-एसयूव्ही अपडेटेड इंटीरियर आणि इतर बदलांसह येईल. त्याची बंपर डिझाईन पूर्वीपेक्षा अधिक शार्प असेल, त्याचप्रमाणे हेड आणि टेल लॅम्पमध्येही बदल दिसून येतील. याशिवाय नवीन डिझाइनसह अलॉय व्हील्सही पाहायला मिळतील. अंतर्गत वैशिष्ट्यांमध्ये प्रीमियम सराउंड साउंड सिस्टम, अपडेटेड डॅशबोर्ड घटक, व्हर्च्युअल-कॉकपिट, एक मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, हेड्स-अप डिस्प्ले, ३६०डिग्री कॅमेरा आणि बरेच काही समाविष्ट होण्याची शक्यता आहे. डॅशबोर्डमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. १०.२५ इंचाचे डिजिटल इंस्ट्रुमेंट आणि १२.३ इंचाचे टचस्क्रीन इन्फोटेंनमेंट सिस्टीम आहे.
BMW X4 इंजिनमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. पेट्रोल व्हेरिएंट २.०-लीटर टर्बोचार्ज्ड युनिट आणि ३.० लिटर सहा सिलेंडर डिझेल इंजिनसह येईल. त्याचे पॉवर आउटपुट २४८ बीएचपी आणि ३५० एनएम टॉर्कच्या जवळपास असेल. डिझेल प्रकारात दोन इंजिन पर्याय मिळतील. यात २.०-लिटर चार-सिलेंडर आणि ३.०-लिटर सहा-सिलेंडर आहे. २.० लिटर चार सिलेंडर इंजिन कमाल १९० बीएचपी पॉवर जनरेट करते. तर ३.० लिटर सहा सिलेंडर डिझेल युनिट २८२ बीएपी आणि ६५० एनएम पीक टॉर्क जनरेट करेल.