Royal Enfield Hunter 350 Update : तरुणांची सर्वांत आवडती गाडी कोणती असेल तर ती म्हणजे Royal Enfield, तरुणांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच Royal Enfield च्या बाईक, बुलेटबाबत एक मोठी क्रेझ आहे. आतापर्यंत या बाईकचे अनेक व्हर्जन भारतीय बाजारपेठेत लाँच झाले आहेत. आता पुन्हा एकदा Royal Enfield ने भारतात त्यांच्या सर्वांत परवडणाऱ्या बाईक हंटर ३५० चे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले आहे.

Royal Enfield Hunter 350 मध्ये पहिल्यांदाच इतके मोठे बदल केले गेले आहे. या बाईकमध्ये नवीन फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत. ही बाईक तरुणांना लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. जर तुम्ही ही बाईक खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर तुम्हाला या बाईकमध्ये नेमकं काय नवीन पाहायला मिळणार ते जाणून घ्या.

Royal Enfield Hunter 350 मध्ये नवीन काय आहे? (Specifications of Royal Enfield Hunter 350)

Royal Enfield Hunter 350 मधील सर्वांत मोठा बदल म्हणजे रियर सस्पेंशन. ते आता लीनियर स्प्रिंगमधून प्रोग्रेसिव्ह स्प्रिंगमध्ये बदलण्यात आले आहे. एक्झॉस्टसाठी नवीन राउटिंगसह, ग्राउंड क्लिअरन्स १० मिमीने वाढवण्यात आला आहे. आधीच्या मॉडेलमध्ये रियर सस्पेंशन हार्ड होते; पण आता ते सॉफ्ट आणि पहिल्यापेक्षा जबरदस्त आहे.

या बाईकमध्ये आता नवीन डिझाइनची सीट आहे, ज्याची प्रोफाइल पूर्वीसारखीच ठेवण्यात आली आहे. कंपनीने या बाईकच्या सर्व व्हर्जनमध्ये स्लिप-असिस्ट क्लचची सुविधा दिली आहे. त्याशिवाय इतरही अनेक अपडेटेड फीचर्स दिली आहेत. नवीन Royal Enfield Hunter 350 मध्ये आता एलईडी हेडलॅम्प, ट्रिपर पॉडसह डिजी-अ‍ॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टॉप व्हेरिएंटमध्ये टाईप-सी चार्जर या सुविधा देण्यात आल्या आहेत. ही बाईक सहा वेगवेगळ्या रंगांत उपलब्ध आहे.

इंजिनामध्ये कोणतेही बदल नाहीत

Royal Enfield Hunter 350 च्या इंजिनामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीप्रमाणेच ही बाईक ३४९ सीसी एअर-कूल्ड जे-सीरिज इंजिनाने सुसज्ज आहे, जी २०.२ एचपी पॉवर आणि २७ एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन त्याच स्लिक-शिफ्टिंग ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे, जे आता स्लिप-असिस्ट क्लचसह जोडलेले आहे.

किंमतीमध्ये किती वाढ?

Royal Enfield Hunter 350 ची एक्स-शोरूम किंमत १.५० लाख रुपयांपासून सुरू होते. त्याच्या मिड-स्पेक व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १.७७ लाख रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १.८२ लाख रुपये आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत ५,००० रुपयांनी वाढवण्यात आली आहे. ही बाईक Honda CB350 RS आणि Jawa 42 सारख्या बाइक्सशी स्पर्धा करेल.