भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार आणि बाइक्सचा बोलबाला सर्वाधिक आहे. दुसरीकडे इलेक्ट्रिक कारच्या किंमती पाहता पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांची मागणी काही कमी झालेली नाही. लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर गाड्या खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाला आहे. खरेदीदारांना गाडी मिळवण्यासाठी वर्ष किंवा महिन्याहून अधिक काळाचा अवधी लागत आहे. जर तुम्हीही गाडीच्या डिलिव्हरीची वाट पाहात असाल तर तुम्ही ७ लाखांहून अधिक खरेदीदारांपैकी एक आहेत. अनेक महिने लोटल्यावरही गाडीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
सेमीकंडक्टरची कमतरता आणि अर्थव्यवस्था उघडल्यानंतर मागणीत अचानक झालेली वाढ या मागची प्रमुख कारणं आहेत. तसेच नवीन मॉडेल्स लाँच करण्यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत. त्यात खरेदीदार वाहने खरेदी करण्यासाठी सरसावले आहेत. यामुळे डिलिव्हरीसाठी अवधी लागत आहे. मात्र प्रतीक्षा करावी लागत असल्याने वाहनासाठी अधिक पैसे द्यावे लागत आहेत. कारण डिलिव्हरीच्या वेळी लागू असलेल्या किमती भरणे आवश्यक आहे. कार कंपन्यांसाठी इनपुट खर्च वाढत आहेत आणि या वर्षाच्या सुरुवातीपासून सरासरी ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रतीक्षा यादीतील मॉडेल्समध्ये महिंद्राची XUV7OO SUV, मारुतीचे सीएनजी प्रकार आणि ह्युंदई क्रेटा, किया सेल्टस, एमजी एस्टर, टाटा पंच, मर्सडिस जीएलएस, आणि ऑडी ट्रॉन इलेक्ट्रिक यांचा समावेश आहे. नवीन मॉडेल्सच्या यशाने उंच भरारी घेत असलेल्या टाटा मोटर्सकडेही एक लाखाहून अधिक गाड्यांचा वेटिंग बॅकलॉग असल्याचा अंदाज आहे. टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन व्यवसायाचे अध्यक्ष शैलेश चंद्र म्हणतात, “विविध मॉडेल्ससाठी प्रतीक्षा कालावधी एक ते सहा महिन्यांदरम्यान आहे. एकूणच, आमची प्रलंबित बुकिंग आमच्या मासिक विक्रीच्या ३.५ पट जास्त आहे.”
कंपनी | अनुशेष |
मारुती | २.५ लाख |
ह्युंदई | १ लाख |
टाटा मोटर्स | १ लाख |
महिंद्रा | १ लाख |
किया मोटर्स | ७५ हजार |
एमजी मोटर्स | ४६ हजार |
VW, Skoda, Toyota, Nissan, Renault, Audi | ७५ हजार |
मर्सडिस इंडिया | २८०० |
इलेक्ट्रिक कारचा आवाज येण्यासाठी विशेष मशिन लावण्याचा विचार; कारण…
देशात मारुतीच्या गाड्यांची सर्वाधिक मागणी आहे. जवळपास २.५ लाख कारचा ग्राहक अनुशेष आहे. कंपनीचे एमडी आणि सीईओ केनिची आयुकावा यांनी अनेकदा विलंबासाठी खरेदीदारांची माफी मागितली आहे. तसेच मागणी अधिक असल्याचं उच्च अधिकाऱ्यांचं मत आहे. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत. सणासुटीचा हंगाम असल्याने नवीन वर्षापर्यंत प्रतीक्षा यादी कायम असेल, असं सांगण्यात येत आहे.