युक्रेन विरोधाक युद्ध पुकारल्यानंतर चहूबाजूंनी रशियाला घेरण्याची रणनिती आखली जात आहे. अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियाला वेसण घालण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनवर आक्रमण केल्यापासून अनेक क्षेत्रातून रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. युक्रेनला सर्वतोपरी पाठिंबा दिला जात आहे. क्रीडा क्षेत्रातही रशियावर बंधनं घालण्यात आली आहेत. यात आता ऑटो क्षेत्रही मागे नाही. रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी ऑटो कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. फोक्सवॅगन, व्होल्वो, मर्सिडिज-बेन्झ, जनरल मोटर्स, डायम्लर ट्रक या कंपन्यांनी रशियातील उत्पादन आणि पुरवठा बंद केला आहे. युक्रेनवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. आता लक्झरी मोटारसायकल उत्पादन करणाऱ्या हार्ले-डेविडसन या कंपनीचं नाव यात जोडलं गेलं आहे. कंपनीने रशियातील उत्पादन आणि पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रशियाचा निषेध करणाऱ्या ऑटो कंपन्यांमध्ये आणखी एका कंपनीची भर पडली आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर सर्वप्रथम व्होल्वो या कंपनीने रशियातील सर्व व्यवहार बंद केले होते. व्होल्वो स्वीडन, चीन आणि अमेरिकेतून रशियात कारची निर्यात करत होती. गेल्या वर्षी व्होल्वो कंपनीने जवळपास ९ हजार गाड्या रशियात विकल्या होत्या. व्होल्वो पाठोपाठ फोक्सवॅगन कंपनीने असाच निर्णय घेत रशियातील व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मन कार उत्पादन कंपन्या डायम्लर ट्रक्स आणि मर्सिडिज बेन्ज यांनीही असाच निर्णय घेतला आहे. फोक्सवॅगन कंपनीनेही रशियातील सर्व व्यवहार बंद केले आहेत.
टाटा मोटर्सने Nexon एसयूव्हीचे चार नवीन प्रकार केले लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
जनरल मोटर्सनेही रशियातील व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जनरल मोटर्सची एकही गाडी रशियात तयार केली जात नाही तरी रशियात दरवर्षी ३००० गाड्यांची विक्री केली जाते. जनरल मोटर्स रशियात सर्वात कमी प्रमाणात गाड्यांचा पुरवठा करणारी कंपनी आहे.