Auto Expo 2023: ऑटो एक्स्पो हा भारतातील सर्वात मोठा ऑटोमोटिव्ह इव्हेंट आहे, जो दर दोन वर्षांनी होतो. हे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) द्वारे आयोजित केले जाते, जी भारतीय ऑटोमोबाईल उत्पादन उद्योगाची सर्वोच्च प्रशासकीय संस्था आहे. नवीन कार, मोटरसायकल, स्कूटर, संकल्पना वाहने, व्यावसायिक वाहने आणि नवीन मोटर वाहन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यात हा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावतो.
२०२२ मध्ये होणारी ऑटोमोटिव्ह स्पर्धा कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता त्याचे आयोजन २०२३ मध्ये केले जात आहे. आज आम्ही तुम्हाला ऑटो एक्सपो कुठे होणार आहे? ते कोणत्या दिवशी होईल आणि त्याची वेळ काय असेल? तसेच तुम्हाला या ऑटो एक्स्पोचा भाग कसा बनता येईल, हे सांगणार आहोत.
ऑटो एक्स्पो २०२३ कुठे होणार?
ऑटो एक्सपो २०२३ हा मागील कार्यक्रमाप्रमाणेच यंदाही इंडिया एक्सपो मार्ट येथे आयोजित केला जाईल. इंडिया एक्सपो मार्ट ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथे जेपी गोल्फ कोर्सजवळ आहे. यासोबतच दिल्लीतील प्रगती मैदानावर ऑटो एक्स्पो-कम्पोनंट शोचे आयोजन करण्यात येणार आहे.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: कार घेताय, थांबा! नवीन वर्षात येतेय सर्वात स्वस्त Tata ची इलेक्ट्रिक SUV मिळणार भन्नाट फीचर्स, अन्…)
ऑटो एक्स्पो २०२३ तारीख आणि वेळ?
ऑटो एक्स्पो २०२३ हा कार्यक्रम १३ ते १८ जानेवारी २०२३ या कालावधीत होणार आहे. १४ आणि १५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते रात्री ८, १६ आणि १७ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ आणि १८ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वसामान्यांसाठी कार्यक्रमाच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम स्थळी शो बंद होण्याच्या एक तास आधी लोकांचा प्रवेश बंद केला जाईल, तर प्रदर्शन हॉलमध्ये प्रवेश प्रत्येक दिवशी बंद होण्याच्या वेळेच्या ३० मिनिटे आधी बंद केला जाईल.
ऑटो एक्सपोला कसे पोहोचणार?
इंडिया एक्स्पो मार्ट दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) च्या इतर भागांशी रस्ते आणि मेट्रो रेल्वे नेटवर्कद्वारे चांगले जोडलेले आहे. ८-लेन ग्रेटर नोएडा एक्स्प्रेसवे मार्गे नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ते सहज उपलब्ध आहे. याशिवाय मेट्रो आणि वैयक्तिक आणि सार्वजनिक वाहतुकीद्वारे हे ठिकाण सहज उपलब्ध आहे. या ठिकाणी सुमारे ८,००० वाहनांची पार्किंग क्षमता असल्याचा दावा केला जात आहे.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: जानेवारीमध्ये Maruti Suzuki करणार धमाका; सोबतच इलेक्ट्रिक कारही येणार )
ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये ‘या’ कंपन्या सहभागी होणार
ऑटो एक्सपो २०२३ मध्ये कार आणि दुचाकींच्या विस्तृत श्रेणीचे अनावरण केले जाण्याची अपेक्षा आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स, महिंद्रा, टोयोटा, किआ, एमजी, रेनॉल्ट आणि निसान सारख्या प्रमुख वाहन उत्पादकांनी या कार्यक्रमात काही आकर्षक संकल्पना कार आणि उत्पादनासाठी तयार मॉडेल्स दाखवण्याची अपेक्षा आहे. मर्सिडीज-बेंझ, जग्वार लँड रोव्हर आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी कार ब्रँड्स देखील या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.