Best Selling Bikes in November 2023: बजाज ऑटो लिमिटेडने नोव्हेंबर २०२३ मध्ये विक्रीत प्रचंड वाढ नोंदवली आहे. देशांतर्गत आणि निर्यात अशा दोन्ही बाजारपेठांमध्ये कंपनीची विक्री वाढली आहे. विक्रीबद्दल बोलायचे झाले तर, पल्सर आणि प्लॅटिना रेंजच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कंपनीची एकूण विक्री (देशांतर्गत + निर्यात) नोव्हेंबर २०२३ मध्ये ३,३२,२२३ युनिट्सपर्यंत वाढली, जी नोव्हेंबर २०२२ मध्ये २,४९,७३१ युनिट्स होती. यावेळी कंपनीने ८२,४९२ युनिट्सने अधिक बाईक विकल्या आहेत. तथापि, ऑक्टोबर २०२३ मध्ये विकल्या गेलेल्या ३,८८,४२८ युनिट्स (देशांतर्गत + निर्यात) च्या तुलनेत ५६,२०५ युनिट्सने विक्री घटली.
देशांतर्गत बाजारात बजाज ऑटोची कामगिरी चांगलीच होती. नोव्हेंबर २०२३ मध्ये कंपनीची विक्री ७६.३७ टक्क्यांनी वाढून २,१०,५३२ युनिट्स झाली, जी नोव्हेंबर २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या १,१९,३६७ युनिट्सपेक्षा ९१,१६५ युनिट्स आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये CT, Pulsar आणि Platina तसेच चेतक आणि Avenger च्या विक्रीत वाढ झाली आहे.
‘ही’ बाईक ठरली नंबर-१
बजाजच्या पोर्टफोलिओमध्ये डोमिनारच्या विक्रीत किंचित घट झाली. तर पल्सरची विक्री वाढली. गेल्या महिन्यात, पल्सरची विक्री ७९.२९ टक्क्यांनी वाढून १,३०,४०३ युनिट झाली, जी नोव्हेंबर २०२२ मध्ये केवळ ७२,७३५ युनिट्स होती. या विक्रीसह, पल्सरचा बजाज बाइक्स रेंजमध्ये ६१.९४ टक्के वाटा आहे. पल्सर रेंजमध्ये १२५cc बाईकच्या ७७,७११ युनिट्स आणि १५०cc बाईकच्या २८,३७३ युनिट्सची विक्री झाली. यासोबतच या बाईकच्या विक्रीत सर्वाधिक वार्षिक वाढ ७२.०३ टक्के आणि १०९.६२ टक्के झाली आहे.
(हे ही वाचा: “७०० रुपयांत थार SUV हवी”, चिमुकल्याच्या मागणीवरुन पुन्हा चर्चेत आलेले आनंद महिंद्रा कोणत्या कार भेट देतात माहितीये?)
Pulsar 200 विक्री
कंपनीने Pulsar 200cc मध्ये देखील लक्षणीय वाढ नोंदवली आहे. या बाईक श्रेणीची विक्री गेल्या महिन्यात १३,५५७ युनिट्सवरून ३९.७६ टक्क्यांनी वाढून १८,९४७ युनिट्सवर गेली, तर पल्सर २५०cc ची विक्री नोव्हेंबर २०२३ मध्ये १०४३ टक्क्यांनी वाढून ५,३७२ युनिट्सवर गेली, जी नोव्हेंबर २०२२ मध्ये फक्त ४७० युनिट्स होती. बजाज प्लॅटिनाची विक्री देखील वार्षिक आधारावर ७९.८३ टक्क्यांनी वाढली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या ३३,७०२ युनिट्सवरून ते गेल्या महिन्यात ६०,६०७ युनिट्सवर वाढले.
चेतक आणि अॅव्हेंजरच्या विक्रीतही वाढ
सध्या, बजाज चेतक ही देशातील तिसरी सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. गेल्या महिन्यात एकूण ८,४७२ युनिट्सची विक्री झाली, जी नोव्हेंबर २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या १,३०० युनिट्सपेक्षा १५३.२० टक्के जास्त आहे. त्याच वेळी, नोव्हेंबर २०२३ मध्ये, अॅव्हेंजरची विक्री २४ टक्क्यांनी वाढून १,६१२ युनिट्सवर आली, तर डोमिनारची विक्री २.२१ टक्क्यांनी घटून ७९५ युनिट्सवर आली.