जगातली पहिली सीएनजी बाईक आज पुण्यात लाँच झाली आहे. बजाज कंपनीने सीएनजी बाईकची निर्मिती केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते बाईक लाँचचा सोहळा पार पडला. सीएनजीवर धावणारी ही पहिली दुचाकी आहे असा दावा बजाज कंपनीने केला आहे. १२५ सीसीचं इंजिन असलेली ही बाईक आहे. या बाईकसाठी केंद्र सरकारने देशात सीएनजी पंपांची संख्या वाढवावी अशी अपेक्षा राजीव बजाज यांनी व्यक्त केली आहे.

बजाज कंपनीने लाँच केली सीएनजी बाईक

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे खासकरुन दुचाकी धारक त्रस्त आहेत. तर, सरकारकडूनही पेट्रोल-डिझेलला पर्याय शोधण्यात येतो आहे. सध्याच्या घडीला बाजारात सीएनजी वाहनांना मोठी मागणी आहे. चारचाकी सीएनजी वाहनांचीही चलती असल्याचं पाहण्यास मिळतं आहे. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच बजाज या दुचाकी क्षेत्रातील नामांकित कंपनीने बजाजची सीएनजी बाईक लाँच केली आहे. ही जगातली पहिली सीएनजी बाईक असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

वाहन उद्योग क्षेत्रात आता भारत तिसऱ्या क्रमाकांवर, गडकरींची माहिती

केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते आज पिंपरी चिंचवडमध्ये या बाईकचा लाँचिंग सोहळा पार पडला. यावेळी, भारत हा वाहनउद्योग क्षेत्रात अगोदर सातव्या क्रमांकाचा देश होता, आता तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, अशी माहितीही या कार्यक्रमाच्या वेळी नितीन गडकरींनी दिली. तसेच, या सीएनजी बाईकची किंमत एक लाखांपेक्षा कमी असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

हे पण वाचा- Best Budget Cars: ८ लाखांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ ३ सीएनजी कार, देतील जबरदस्त मायलेज; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत

बजाजने आणलेल्या सीएनजी बाईकची किंमत काय?

बजाजने आणलेली ही बाईक तीन वेगळ्या वेगळ्या मॉडेल्समध्ये असणार आहे. या मॉडेल्सची किंमत अनुक्रमे ९५ हजार, १ लाख ५ हजार आणि १ लाख १० हजारांच्या घरात असणार आहे. लवकरच या बाईक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

सीएनजी बाईकची खासियत काय काय?

ही बाईक १२५ सीसी इंजिन क्षमता असलेली बाईक आहे

या बाईकला दोन किलो सीएनजीची टाकी आहे

सीएनजीची टाकी सीटच्या खाली बसवण्यात आली आहे

सीएनजी टाकीसाठी पेट्रोल टाकीच्या वरपर्यंत सीट देण्यात आलं आहे

या बाईकला दोन लिटरचा पेट्रोल टँकही असणार आहे

या बाईकचा सरासरी अॅव्हेरज २३० किमी आहे जो पेट्रोल आणि सीएनजी मिळू असेल असं कंपनीने म्हटलं आहे.

बजाज फ्रिडम असं या बाईकचं नाव आहे

नितीन गडकरी काय म्हणाले?

“सीएनजी बाईकची किंमत १ लाखांपेक्षा कमी असावी अशी अपेक्षा मला बजाज कंपनीकडून आहे. एकदा टाकी फुल केली की ही बाईक २३० किमीचा अॅव्हेज देईल असा दावा केला जातो आहे. पण या बाईकची सीएनजी टाकी शोधून काढायची म्हणजे एक संशोधनाचा भाग आहे.” असं नितीन गडकरी मिश्किलपणे म्हणाले. त्याचप्रमाणे बजाज कंपनीने या बाईकची निर्मिती केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. बाईक निर्मिती प्रक्रियेत जी टीम सहभागी होती त्या प्रत्येकाचं मी अभिनंदन करतो असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.