Second Hand Bike Tips: भारतात इतर वाहनांच्या तुलनेत बाईक चालवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक वर्षी लाखो लोक बाईक खरेदी करतात. खरं तर, दैनंदिन प्रवासात बाईक खूप महत्त्वाची आहे. भारत ही जगातील सर्वांत मोठी दुचाकी बाजारपेठ आहे. बाईक आणि स्कूटरखरेदीचे अनेक पर्याय बाजारात आहेत; ज्यामध्ये नवीन आणि जुन्या दोन्हींचा समावेश आहे. नवीन बाईक खरेदी करणे तुलनेने सोपे आहे. परंतु, सेकंड हॅण्ड बाईक नवीन बाईकच्या तुलनेत खूपच कमी किमती खरेदी करता येते. त्यामुळे कित्येक जण सेकंड हॅण्ड बाईकचा पर्याय स्वीकारतात. असे असले तरी सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करतेवेळी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते; ज्यात कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुम्ही स्वतःसाठी जुनी बाईक शोधण्यापूर्वी बाईक तुम्हाला कोणत्या कारणासाठी लागणार आहे. हे लक्षात घ्या. कारण- कोणत्या प्रकारची बाईक तुमच्या गरजेला अनुकूल आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही फक्त रोजच्या प्रवासासाठी किंवा लांब पल्ल्याच्या रायडिंगसाठी बाईक खरेदी करण्याचा विचार करीत आहात? तुम्हाला ट्रॅकवर तुमचा हात साफ करायचा आहे किंवा इंधन कार्यक्षमता ही तुमची प्राथमिकता आहे? हे काही असे आवश्यक प्रश्न आहेत, जे तुम्ही बाईक विकत घेण्यापूर्वी स्वतःला विचारले पाहिजेत.
तपासणी आणि रायडिंग
तुम्ही निवडलेल्या बाईकची चाचणी करून घ्या आणि सर्व पार्ट्स योग्यरीत्या काम करीत आहेत का ते चेक करा. त्यामध्ये इंजिन, सस्पेन्शन, ब्रेक, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि बरेच काही समाविष्ट आहे. जर तुम्हाला गंज किंवा वाकलेल्या सस्पेन्शन कॉइलची कोणतीही चिन्हे दिसली, तर सावधगिरी बाळगा. मग त्याबाबतच्या सल्ला व तपासणीसाठी अनुभवी मित्र किंवा विश्वासू मेकॅनिक सोबत घ्या. तसेच बाईकवर कोणतेही थकित दंड आहेत का ते तपासा, जे सध्याच्या मालकाने भरणे आवश्यक आहे. व्यावसायिक सेकंड हॅण्ड बाईक डीलर्स सखोल तपासणी करतात आणि अनेक समस्या दूर करून, वॉरंटीदेखील देतात. मात्र, त्यासाठी तो काही अतिरिक्त शुल्क आकारू शकतो.
संशोधन करा
कोणतीही सेकंड हॅण्ड बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहे की नाही हे ऑनलाइन जाहिरातीमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये पाहा. तुम्ही तुमच्या संबंधित शहरातील अनेक सेकंड हॅण्ड बाईक डीलर्सना भेट देऊ शकता. किंवा तुम्ही ऑनलाइन उपलब्ध असलेल्या सेकंड हॅण्ड बाईक विक्रेत्यांचा पर्यायदेखील वापरून पाहू शकता. कोणतीही सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करताना घाई करू नका.
हेही वाचा: हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
वाटाघाटी करा
बाईकचे बारकाईने परीक्षण करून, तुम्ही सेकंड हॅण्ड बाईकसाठी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करा. जर घेणार असलेल्या सेकंड हॅण्ड बाईकचा टायर खराब झाला असेल, तर बाईक खरेदी केल्यानंतर तुम्हाला नवीन टायर बसवावा लागेल. हा तत्काळ खर्च आहे. ते लक्षात घेऊन, तुम्ही वाटाघाटीद्वारे किंमत कमी करू शकता. बाईकच्या इतर घटकांच्या आयुष्यावर अवलंबून तुम्ही किमतीबाबत सौदेबाजी करू शकता.
तसेच जुन्या बाईकचे बाजारमूल्य किती आहे ते तपासा आणि मग जी सेकंड हॅण्ड बाईक तुम्हाला खरेदी करायची आहे, ती बाईक तुमच्या अपेक्षा पूर्ण करते की नाही हे तपासून बघा.