Best Selling 7-Seater in India: भारतात अधिक आसन क्षमता असलेल्या गाड्या अधिक पसंत केल्या जातात. देशात सात सीटर कारची डिमांड प्रचंड वेगाने वाढत आहे. अनेकजण आपल्या कुटुंबियांच्या विचार करून कार खरेदी करतात. यात मोठं कुटुंब असल्यास अनेक लोक सात सीटर कार खरेदी करण्यास पसंती दर्शवतात. जून महिना हा वाहन उत्पादक कंपन्यांसाठी खूप चांगला गेला. या महिन्यात बहुतांश वाहन कंपन्यांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात पुन्हा एकदा मारुती सुझुकीच्या गाड्यांना ग्राहकांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे.

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने जून २०२४ महिन्याचा विक्री अहवाल प्रसिद्ध केला आहे. इतर सर्व गोष्टींप्रमाणे, यावेळी देखील कंपनीच्या सर्वात स्वस्त सात सीटर कारने विक्रीत चमकदार कामगिरी केली आहे. मारुती Eeco च्या विक्रीत पुन्हा एकदा वाढ दिसून आली आहे. ही भारतातील सर्वात परवडणारी सात सीटर MPV कार आहे. मारुती सुझुकीची विक्री वाढवण्यात ही कार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या महिन्यात (जून २०२४), मारुती सुझुकीने ईकोच्या १०,७७१ गाड्यांची विक्री केली होती, तर गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ९,३५४ होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी विक्री चांगली झाली आहे. मारुती सुझुकीची ७ सीटर कार Maruti Eeco चा जून महिन्यात बोलबाला पाहायला मिळाला.

(हे ही वाचा : Yamaha, Bajaj च्या स्कूटर्सला धोबीपछाड! TVS च्या ‘या’ स्कूटरला तुफान मागणी; खरेदीसाठी लागल्या रांगा, किंमत…)

कशी आहे मारुती ईको?

प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या कार भारतात खूप पंसती केल्या जातात. मारुतीच्या अनेक अशा कार आहेत ज्या सामान्यांच्या खिशाला परवडतात. यातलीच मारुतीची एक कार आहे, ती म्हणजे Eeco MPV. मारुती ईको ही कार कंपनी ५ सीटर आणि ७ सीटर अशा दोन पर्यायांमध्ये विकते. या कारची किंमत ५.२५ लाख रुपये ते ६.५१ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. या एक्स शोरूममधल्या किंमती आहेत. या कारमध्ये कंपनीने १.२ लीटर पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन ८१ पीएस पॉवर आणि १०४.४ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. ही कार सीएनजी व्हेरिएंटमध्ये देखील विकली जाते. ईकोचं सीएनजी मॉडेल ७२ पीएस पॉवर आणि ९५ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. ही कार पेट्रोलवर १९.७१ किमी प्रति लीटर तर सीएनजीवर २६.७८ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते.

सुरक्षिततेसाठी, मारुती सुझुकी Eeco मध्ये दोन एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, स्लाइडिंग दरवाजे, चाइल्ड लॉक आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. Eeco मध्ये १३ प्रकार उपलब्ध आहेत. Eeco मध्ये ग्राहकांना डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एअर प्युरिफायर, रिक्लाइनिंग फ्रंट सीट्स, नवीन स्टीयरिंग व्हील आणि मॅन्युअल एअर कंडिशनरसाठी रोटरी कंट्रोल्स सारखे फीचर्स मिळतात.