Best-Selling Electric Scooters in India: पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत भारतीय ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी सातत्याने वाढत आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे अधिक पर्याय बाजारात उपलब्ध असल्याने विक्रीही वाढली आहे. भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केट खूप वेगाने वाढत आहे. TVS, Hero, Ather यासह अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारात विक्री करत आहेत, परंतु एक कंपनी अशी आहे, ज्या कंपनीने विक्रीच्या बाबतीत या मोठ्या कंपन्यांनाही मागे टाकले आहे. जाणून घेऊया विक्रीच्या बाबतीत कोणत्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनीने मारली बाजी…
आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या सेगमेंटच्या मार्केट लीडर ओला इलेक्ट्रिकबद्दल सांगत आहोत, या कंपनीने जुलै २०२४ मध्ये ११४.४९ टक्के वार्षिक वाढीसह एकूण ४१,६२४ इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली. बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजेच जुलै २०२३ मध्ये कंपनीची एकूण विक्री फक्त १९,४०६ होती. विक्रीतील या वाढीमुळे, ओला इलेक्ट्रिकचा या विभागातील बाजारातील हिस्सा ३८.६४ टक्के झाला आहे. ओला भारतातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी ठरली आहे.
(हे ही वाचा:बाजारपेठेत उडाली खळबळ, सीएनजी बाईक सादर केल्यानंतर बजाज करणार आणखी मोठा धमाका, जाणून घ्या नवी योजना)
टीव्हीएस आणि बजाजच्या वार्षिक विक्रीत वाढ
विक्रीच्या या यादीत टीव्हीएस दुसऱ्या स्थानावर होती. या कालावधीत, TVS ने ८७.४० टक्के वार्षिक वाढीसह एकूण १९,४८६ इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री केली. TVS आपल्या iQube इलेक्ट्रिक स्कूटरचे तीन मॉडेल बाजारात विकत आहे. बजाजने या यादीत तिसरे स्थान पटकावले आणि एकूण १७,६५७ इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री ३२७.४३ टक्के वार्षिक वाढीसह नोंदवली.
याशिवाय विक्रीच्या या यादीत अथर चौथ्या क्रमांकावर आहे. या कालावधीत, Ather ने ५०.८९ टक्के वार्षिक वाढीसह एकूण १०,०८७ इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री केली. तर Hero MotoCorp ४०९.६० टक्के वार्षिक वाढीसह Vida इलेक्ट्रिक स्कूटरच्या एकूण ५,०४५ दुचाकींची विक्री करून या यादीत पाचव्या स्थानावर आहे.
ओलाचे तीन मॉडेल बाजारात उपलब्ध
सध्या ओला इलेक्ट्रिकचे तीन इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये S1 Pro, S1 Air आणि S1 यांचा समावेश आहे Ola S1 pro ही कंपनीची सर्वात प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर आहे ज्याची किंमत १.३४ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर Ola S1 Air ची किंमत १,०६,४९९ रुपये (एक्स-शोरूम) आणि Ola S1 X ची किंमत ७४,९९९ रुपये आहे.