ऑटोक्षेत्रात गाड्यांमध्ये रोज नवनवे फिचर्स समोर येत असतात. गाड्यांच्या डिझाईनपासून आकर्षक फिचर्स ग्राहकांचं लक्ष वेधून घेत असतात. असं असलं तरी ग्राहकांसमोर रंग निवडण्याचा मोठा पेच असतो. कोणत्या रंगाची गाडी घ्यावी असा प्रश्न असतो. आवडत्या रंगाची गाडी वेळेत मिळाली नाही. वेळेअभावी दुसरा निवडला जातो. मात्र आता ही समस्या सुटणार आहे. जर्मन लक्झरी कार कंपनी बीएमडब्ल्यूने CES 2022 मध्ये आपली एक कार सादर केली आहे, ही गाडी एका क्लिकवर रंग बदलते. BMW iX Flow नावाची ही कार फक्त एका बटणाच्या स्पर्शाने रंग बदलते. बीएमडब्ल्यूने या कारच्या लाँचिंगवेळी सांगितले की, “जसे तुम्ही कपडे निवडता, तुम्ही तुमचे सोशल मीडिया स्टेटस निवडता, तुम्ही आता तुमच्या कारचा रंग निवडू शकता. बीएमडब्ल्यूच्या या कारमध्ये रंग बदलण्यासोबतच इतरही फिचर्स आहेत. जर तुमची कार पार्किंगमध्ये हरवली असेल, तर आम्ही ती फ्लॅश करू शकता जेणेकरून तुम्ही ती ओळखू शकाल.”
व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये गडद पांढऱ्या रंगात असलेली बीएमडब्ल्यूची गाडी आहे. जेव्हा गाडीत असलेली व्यक्ती रंग बदलणारी पेंट सिस्टम सक्रिय करते, तेव्हा पांढरा रंगातून ती गाडी राखाडी रंगात बदलू लागतो. बाहेरील रंग पूर्णपणे राखाडी होतो. तर दुसऱ्या व्हिडिओत पांढऱ्या रंगाची गाडी राखाडी रंगाची होताना दिसत आहे.
कंपनीने या कारच्या पृष्ठभागावर ई-इंक कोटिंग केले आहे. त्यात लाखो मायक्रोकॅप्सूल आहेत, ज्यांचा व्यास मानवी केसांएवढा आहे. प्रत्येक मायक्रोकॅप्सूलमध्ये पांढर्या रंगाचे निगेटिव्ह चार्ज आणि काळ्या रंगाचे पॉझिटिव्ह चार्ज केलेले रंगद्रव्य असतात. बटण दाबून जेव्हा या रंगद्रव्यांना संदेश पाठवला जातो तेव्हा ते पृष्ठभागाचा रंग बदलतात. हे जवळपास मोबाईलच्या स्क्रीनवर वॉलपेपर बदलण्यासारखे आहे.