हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) भारतीय बाजरपेठेत आपली नेक्स्ट जनरेशनमधील करिझ्मा (Karizma) स्पोर्ट्स बाइक लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनी आपली स्पोर्ट्स बाइक करिझ्मा XMR 210 चे नवीन व्हर्जन २९ ऑगस्ट रोजी लॉन्च करणार आहे. अपकमिंग बाइकची झलक सादर करण्यापूर्वी हिरो मोटोकॉर्पने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनसह एक लहानसा व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेता हृतिक रोशनची ही व्हिडीओ क्लिप जुन्या करिझ्माच्या जाहिरातीमधील आहे. ज्यामध्ये तो ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून दिसला होता. हृतिक रोशननेदेखील ही व्हिडीओ क्लिप त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. अशा परिस्थितीत तो पुन्हा एकदा आगामी करिज्माचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून पुनरागमन करणार असल्याची चर्चा आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.
Hero Karizma XMR 210: मिळणार हे फिचर
इंटरनेटवर शेअर केलेलया आधीच्या आणि अलीकडच्या टीझरवरून हे स्पष्ट होते की आगामी लॉन्च होणाऱ्या करिझ्मामध्ये एक खास प्रकारचा व्हिज्युअल टच पाहायला मिळणार आहे. या स्पोर्ट्स बाइकमध्ये फेअरिंग, मोठे विंडशिल्ड, फ्लोटिंग टेल सेक्शन आणि स्पिल स्टाइल सीट यांसारखी अनेक फीचर्स मिळतील. रिअर व्ह्यू मिरर फेअरिंगवरच बसवलेले दिसतात.
हिरो करिझ्मा XMR 210 मध्ये सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड टेक्नॉलॉजीवर आधारित अपडेटेड २१० सीसीचे इंजिन मिळण्याची शक्यता आहे. कंपनीकडून इंजिनचे स्पेसिफिकेशन्स अधिक प्रमाणात उघड करण्यात आलेले नाही. यात असणारे इंजिन २५ बीएचपी कमाल पॉवर आणि २२ एनएम टॉर्क जनरेट करू शकते अशी अपेक्षा आहे. हे इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात येऊ शकते.