Maruti Suzuki Swift Full Finance plan : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी सर्वाधिक हॅचबॅक कार्स विकते. भारतात गेल्या अनेक दशकांपासून हॅचबॅक कार्सना सर्वाधिक पसंती मिळत आली आहे. हॅचबॅक कार्सची यादी मारुती सुझुकी स्विफ्टच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कारण ही देशात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या हॅचबॅक कार्सपैकी एक आहे. या कारला सर्वाधिक पसंती मिळण्याचं प्रमुख कारण म्हणजे या कारची किंमत आणि लूक. ही स्वस्त हॅचबॅक कार्सपैकी एक आहे. यासह ही कार उत्तम मायलेज देखील देते.

मारुती सुझुकी स्विफ्ट ही कार वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये विकली जाते. ६.४९ लाख रुपयांमध्ये (एक्स शोरूम प्राइस) या कारचं बेसिक व्हेरिएंट मारुती सुझुकी स्विफ्ट एलएक्सई विकलं जातं. या कारची ऑन रोड प्राइस ७.२८ लाख रुपये इतकी आहे. मात्र, ७.२८ लाखांची कार एकरकमी घेणं सर्वांनाच शक्य नसतं. अशा वेळी कंपनीने ही कार ईएमआयवर उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक एक लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर ही कार घरी घेऊन जाऊ शकतात.

तुम्ही देखील स्विफ्ट किंवा अशीच एखादी हॅचबॅक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तर आम्ही तुमच्यासाठी या कारचा फायनॅन्स प्लॅन घेऊन आलो आहेत. ऑनलाइन कार फायनॅन्स कॅलक्युलेटरनुसार मारुती सुझुकी स्विफ्टच्या बेस मॉडेलसाठी (स्वस्त मॉडेल) तुम्हाला ७,२८,५३६ (ऑन रोड प्राइस) रुपये मोजावे लागतील. ही कार तुम्ही १ लाख रुपयांचं डाउन पेमेंट करून घरी घेऊन जाऊ शकता. बँक तुम्हाला ९.८ टक्के व्याजदराने ६,२८,५३६ रुपयांचं कर्ज देईल. त्यानंतर पुढील पाच वर्षे तुम्हाला दर महिन्याला १३,२९३ रुपयांचा हप्ता म्हणजेच ईएमआय भरावा लागेल.

कसं आहे Maruti Swift LXi (Petrol) चं बेस मॉडेल?

मारुती सुझुकी स्विफ्ट एलएक्सआयमध्ये तुम्हाला ११९७ सीसी क्षमतेचं १.२ लीटर पेट्रोल इंजिन मिळेल, जे ६८.८ बीएचपी पॉवर आणि १०१.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करतं. यासह ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळेल. या कारच्या मायलेजबद्दल बोलायचं झाल्यास कंपनीने दावा केला आहे की ही कार २४.८ किमी प्रति लीटरपर्यंतचं मालयेज देते. हे मायलेज एआरएआय प्रमाणित आहे. (कंपनीने ही कार फॅक्टरी फिटेड सीएनजी पर्यायासह देखील उपलब्ध केली आहे. मात्र, त्यासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील.)

टीप

ही कार एक लाख रुपयांचं डाऊन पेमेंट व ९.८ टक्के व्याजदरासह घरी न्यायची असेल तर तुमचा सिबिल स्कोर उत्तम असणं आवश्यक आहे. तुमचा सिबिल स्कोर बरा नसेल तर तुम्हाला कर्ज घेताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.