New Car Buying Tips : नवीन कार खरेदी करणे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी तुम्ही अनेक वर्षे पैसे साठवता आणि कुटुंबासाठी स्वप्नातील कार खरेदी करता. पण, कार बुक केल्यानंतर शोरूममधून डिलिव्हरी घेण्यापूर्वी ती पूर्णपणे तपासून घेणे खूप महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा उत्साहाच्या भरात लोक घाई-गडबडीत नवीन कारची डिलिव्हरी घेतात. असे केल्याने कधी कधी मोठे नुकसान होऊ शकते.

त्यामुळे कारची डिलिव्हरी घेण्यापूर्वी कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि कोणत्या गोष्टी बारकाईने तपासल्या पाहिजेत हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत; ज्या फॉलो करून, तुम्ही तुमची नवी कार व्यवस्थित तपासून घेऊ शकता.

गाडीच्या तपासून घ्यावयाच्या बाबी

१) बाहेरील बाजू : कारची डिलिव्हरी घेण्यापूर्वी त्याची बाहेरील बाजू काळजीपूर्वक तपासून घ्या. कारण- कारवर स्क्रॅच, डेंट व पेंट खराब झालेले असू शकते. त्यासाठी कारची बाहेरील बाजू आधी तपासा. त्यानंतर संपूर्ण बॉडी पॅनेल काळजीपूर्वक पहा. तसेच कारचे सर्व लाईट्स आणि टर्न सिग्नल इंडिकेटर इत्यादी तपासा. त्याशिवाय कारचे इंटेरियरदेखील तपासा.

२) सीट्स : त्याशिवाय कारच्या सीट्स आणि कुशन तपासा. कारण- काही वेळा ते फाटलेले किंवा त्यावर डाग असू शकतात. त्याशिवाय इन्फोटेन्मेंट सिस्टीम, एअर कंडिशनिंग व पॉवर विंडो यांसारख्या सुविधा, सर्व इलेक्ट्रॉनिक भाग यांची व्यवस्थित तपासणी करा.

३) इंजिन : कारमध्ये इंजिन ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे त्याचीही तपासणी आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आपण सर्व कनेक्टर आणि नट व बोल्ट योग्य रीतीने बसवले आहेत की नाही, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

४) टायर्स : गाडी चार चाकांवर चालत असते. त्यामुळे त्या चाकांवरील टायर्स तपासून घेताना त्यांची ग्रिप वगैरे तपासा. त्यामुळे तुम्हाला टायर नवीन आहेत की बदलले आहेत याची माहिती मिळेल.

५) टेस्ट ड्राइव्ह : कारची डिलिव्हरी घेण्यापूर्वी टेस्ट ड्राइव्ह करा. या वेळी इंजिन किंवा सस्पेन्शनचा आवाज काळजीपूर्वक ऐका. कोणताही विचित्र आवाज येत असल्यास काही गडबड नाही ना हे पाहून घ्या. स्टीअरिंग व्यवस्थित वळत आहे का तेदेखील तपासा. टेस्ट ड्राइव्हदरम्यान ब्रेकदेखील तपासा. सर्व बाबी व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्या.

६) कागदपत्रे : कारचे आतील आणि बाहेरील भाग तपासल्यानंतर कागदपत्रे तपासणेदेखील आवश्यक आहे. त्यासाठी डिलिव्हरी घेण्यापूर्वी निश्चितपणे कार मॅन्युअल, वॉरंटी पेपर, सर्व्हिस मॅन्युअल इत्यादी तपासून घ्या. त्याशिवाय कार नोंदणी क्रमांक आणि इन्शुरन्स पेपर यांसारखी कागदपत्रेदेखील तपासा. तसेच जॅक आणि व्हील स्पॅनरसारखे आवश्यक टूलकिट कारसोबत दिली आहेत की नाही हेदेखील तपासा.