E-Waste Car: ऑटो एक्सपो 2023 देशात मोठ्या दिमाखात पार पडला आहे. या ऑटो एक्सपो शो मध्ये देश विदेशातील बड्या कंपन्यांनी आपली वाहने अनवील केली आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, या शो मध्ये एक अतिशय वेगळी कार दिसली. या कारची सर्वात खास गोष्ट म्हणजे, ती लोखंडापासून नाही तर इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून (ई-कचरा) बनवण्यात आली होती.
ई-कचऱ्यापासून कोणी बनविली कार?
ई-कचऱ्यापासून बनवलेली ही कार जयपूरस्थित व्हिंटेज कार रिस्टोरर हिमांशू जांगीड यांनी सादर केली होती. हिमांशू कार्टिस्ट नावाची कार रिस्टोरिंग कंपनी चालवतो. ही कार ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यासाठी ते अनेक महिन्यांपासून तयारी करत होते.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: यंदाच्या ‘ऑटो एक्स्पो’ ला ‘इतक्या’ चाहत्यांनी केली गर्दी, आकडेवारी पाहून तुमचेही डोळे फिरतील)
ई-कचरा आणि ऑटोमोबाईल भंगारापासून कशी बनविली कार
हिमांशूने सांगितले की, ही कार खराब इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि ऑटोमोबाईल स्क्रॅपच्या कचऱ्यापासून बनवण्यात आली आहे. या कचऱ्यामध्ये चिप्स, सर्किट बोर्ड, कीबोर्ड आणि इतर अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिक सर्किट्सचा समावेश आहे. त्याच वेळी, खराब बॅरिंग, स्टील वायर, चेन, चामड्याचा पट्टा आणि जंक केलेल्या वाहनांमधून काढलेले कॅनव्हास देखील वापरले गेले आहेत.
ही कार दिसते अँबेसिडरसारखी
ई-कचऱ्यापासून बनवलेली ही कार प्रत्यक्षात अँबेसिडरच्या चौकटीत तयार करण्यात आली आहे. कारची वरची रचना काढून त्यात ई-कचरा बसवण्यात आला आहे. डिझायनरने सांगितले की, ही कार फ्रेमवर तयार करण्यासाठी त्याला दोन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागला. या कारशिवाय त्यांनी ई-कचऱ्यापासून बनवलेली स्कूटरही बाजारात आणली.