Tips To Avoid Rats In Car : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. पण याचबरोबर तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. इतर स्टार्सप्रमाणेच कार्तिक आर्यनलाही लक्झरी आणि स्पोर्ट्स कारची खूप आवड आहे. त्याच्याकडे कोट्यावधी रुपयांच्या कारचे चांगले कलेक्शन आहे. पण एका मुलाखतीत कार्तिकने त्याच्याकडील सर्वात महागड्या कारचे उंदरांमुळे मोठे नुकसान झाल्याचा खुलासा केला आहे.

कार्तिकला गिफ्ट म्हणून मिळालेल्या महागड्या मॅक्लारेन जीटी सुपरकारचे उंदरांनी मोठे नुकसान केले. गॅरेजमध्ये पार्क केलेल्या त्याच्या कारचे मॅट्स आणि इतर गोष्टी उंदरांनी अक्षरश: कुरतडून टाकल्या, पण केवळ बॉलिवूड स्टार्सच नाहीत तर अनेक सामान्य लोकही या समस्येने त्रस्त आहेत. कार्तिक आर्यनच्या कारप्रमाणे उंदरांनी तुमच्या कार नुकसान करु नये असे जर तुम्हालाही वाटत असेल, आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्या आजच फॉलो करुन तुम्ही तुमच्या कारचे उंदरांपासून संरक्षण करु शकता.

कारचे उंदरांपासून संरक्षण करण्यासाठी फॉलो करा ‘हे’ सोपे उपाय

१) निष्काळजीपणा टाळा

कारमधून प्रवास करताना अनेक लोक निष्काळजी असतात, त्यामुळे कारमध्ये उंदीर शिरण्याचा धोका वाढतो. याशिवाय विविध प्रकारच्या निष्काळजीपणामुळे उंदरांमुळे गाडीचे मोठे नुकसान होते. जसे की, काहीजण कारचा वापर तर करतात पण तिची नीट देखभाल करत नाही, अनेकदा चुकीच्या ठिकाणी नेऊन कार उभी करतात. कारमध्ये कचरा असेल तर तो साफ करत नाहीत. पण अशा काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमची कार उंदरांपासून सहज वाचू शकते.

हेही वाचा – धक्कादायक! भररस्त्यात महिलेचा तोंड दाबून विनयभंग अन् मदतीसाठी ओरडताच…; घटनेचा video व्हायरल

२) कारमध्ये खाद्यपदार्थ सोडून जाऊ नका

कारमधून प्रवास करताना लोक विविध प्रकारे खाद्यपदार्थ खातात, पण खाताना अनेकदा ते कारमध्ये पडते. अशावेळी योग्य साफसफाई न केल्यामुळे खाद्यपदार्थ खूप वेळ गाडीतच पडून राहते. याशिवाय काही लोक कारमध्येच खाद्यपदार्थ ठेवून जातात. ज्याच्या वासामुळे उंदीर आकर्षित होतात आणि कारमध्ये शिरतात. अशावेळी ते कारचे मोठे नुकसान करतात. म्हणून कारमध्ये खाद्यपदार्थ खाणे शक्यतो टाळा, तसेच खाद्यपदार्थ कारमध्ये ठेवू जाऊ नका.

३) कार खूप दिवस एका ठिकाणी पार्क करुन ठेवू नका

काही लोक त्यांची कार एकदा पार्क केल्यानंतर बरेच दिवस वापर तर सोडा तिच्याकडे पाहत देखील नाही, असे केल्याने कार खराब होण्याचा धोका वाढतो. कार एकाच ठिकाणी बराच वेळ उभी राहिल्यास उंदीर तिथे आपले घर बनवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ते कारचे विविध पार्ट्स कुरतडून कारमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला जर तुमची कार सुरक्षित ठेवायची असेल तर कार सतत वापरत राहा. ती खूप दिवस एका ठिकाणी पार्क करुन ठेवू नका.

४) कारमध्ये ‘या’ गोष्टींचा वापर करा

तुमच्या महागड्या कारला उंदरांपासून दूर ठेवण्यासाठी नॅफ्थलीन बॉल्सचाही वापर केला जाऊ शकतो. याशिवाय कारमध्ये रेपेलेंट स्प्रे, पेपरमिंट ऑइल किंवा तंबाखूची पुढी ठेवून उंदरांना कारपासून दूर ठेवता येते.