Maruti Suzuki Car Sale: भारतीय वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीचं बाजारपेठेत वर्चस्व आहे. भारतीय बाजारात मारुती सुझुकी कंपनीच्या कार सर्वाधिक पसंत केल्या जातात. मारुती सुझुकी ही देशातील सर्वांत मोठी कार विकणारी कंपनी आहे. दर महिन्याला मारुती सुझुकी लाखो वाहनांची विक्री करते आणि या कंपनीच्या यादीत सर्वाधिक वाहने आहेत. गेल्या महिन्यातही मारुती सुझुकी कार्सची सर्वाधिक विक्री झाली आहे. पण, कंपनीकडे अशी एक कारदेखील आहे, ज्या कारची काही दिवसांपूर्वी धडाक्यात विक्री होत होती. परंतु, आता कंपनीच्या या कारची विक्री अचानक कमी होत असल्याचे दिसत आहे. चला तर पाहूया त्यांच्या कोणत्या कारच्या विक्रीत घट झाली ते.

देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये मारुती सुझुकीच्या कार सर्वाधिक विकल्या जातात. पण यावेळी मारुती सुझुकी फ्रॉन्क्सच्या विक्रीत मोठी घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने १३,६६९ कार विकल्या होत्या. तर गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या २१,४६१ झाली होती. अशा परिस्थितीत यावेळी कंपनीने ७,७९२ कार कमी विकल्या आहेत. अशा परिस्थितीत, कंपनीच्या विक्रीत ३६.३१% (MoM) घट झाली आहे. या कारच्या विक्रीत इतकी मोठी घसरण यापूर्वी कधीही पाहण्यात आली नव्हती. आता यामागील कारण काय आहे? हे अद्यापही समजू शकले नाही.

किंमत जास्त असल्याने नवीन मॉडेलची प्रतीक्षा

मारुती सुझुकी फ्रॉन्क्सच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने ही कार आता खूप महाग झाली आहे. किंमत वाढल्यानंतर, फ्रॉन्क्सची एक्स-शोरूम किंमत आता ७.५२ लाख रुपये झाली आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ९.४३ लाख रुपये झाली आहे. आता ग्राहकांना या किमतीत अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. असे मानले जात आहे की, फ्रॉन्क्सचे एक नवीन मॉडेल लाँच केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत ग्राहक सध्याची कार खरेदी करण्याऐवजी नवीन मॉडेलची वाट पाहत आहेत, हेदेखील कमी विक्रीचे एक कारण असू शकते…

इंजिन आणि पॉवर

FRONX मध्ये १.० लिटर पेट्रोल इंजिन आहे, ज्यामध्ये स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. त्याशिवाय, या कारमध्ये १.२ लिटर के-सिरीज अॅडव्हान्स्ड ड्युअल जेट, ड्युअल व्हीव्हीटी पेट्रोल इंजिन देखील आहे जे ५ स्पीड मॅन्युअल व ६ स्पीड एजीएस गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

त्याशिवाय ते स्टार्ट स्टॉप तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. तसेच, ही कार सीएनजीमध्येदेखील उपलब्ध आहे. सीएनजी मोडवर कारचे मायलेज २८.५१ किलोमीटर आहे. फ्रॉन्क्सची लांबी ३९९५ मिमी, रुंदी १७६५ मिमी, उंची १५५० मिमी आहे. त्यात ३०८ लिटर बूट स्पेस आहे.