SUV Under 6 Lakh: भारतीय बाजारपेठेत परवडणाऱ्या SUV ची मागणी वाढत आहे. या सेगमेंटमध्ये लोकांना टाटा पंच, मारुती ब्रेझा आणि नेक्सॉन खूप आवडत आहेत. या तिन्ही गाड्यांच्या विक्रीत तीव्र स्पर्धा आहे. गेल्या महिन्याबद्दल बोलायचे झाले तर, टाटा मोटर्सच्या मिनी एसयूव्ही पंचने विक्रीत नवा विक्रम केला आहे.
जानेवारी २०२४ मध्ये, मारुती बलेनोनंतर टाटा पंच ही देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. टाटाच्या या मिनी एसयूव्हीने जानेवारीमध्ये १७ हजार ९७८ युनिट्स विकल्या आहेत. तर गेल्या वर्षी याच महिन्यात या एसयूव्हीची १२ हजार ००६ युनिट्स विकली गेली होती. तर टाटा नेक्सॉनची विक्री १७ हजार १८२ युनिट्सवर होती. टाटाची ही ५-सीटर SUV ५-स्टार ग्लोबल NCAP सुरक्षा रेटिंगसह येते.
पंचची किंमत ६ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ९.५२ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. यात ३६६ लीटरची बूट स्पेस आहे. पंचने बाजारपेठेत वर्चस्व गाजवले आहे आणि ब्रेझा, बलेनो आणि डिझायर यांसारख्या मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारशी सातत्याने स्पर्धा करत आहे. आकाराने कॉम्पॅक्ट असूनही, पंचमध्ये ५ लोक बसू शकतील एवढी जागा आहे.
(हे ही वाचा : कार खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या ‘या’ २ इलेक्ट्रिक गाड्या झाल्यात स्वस्त )
ऑटोमोबाईल तज्ज्ञांच्या मते, ही कार तिच्या सेगमेंटमध्ये सर्वोत्तम हाय स्पीड आणि हायवे स्टॅबिलिटी देते. कारचे सस्पेन्शन परफॉर्मन्स खडबडीत रस्त्यावर अगदी आरामदायी आहे, तर ती जास्त वेगाने उत्कृष्ट स्थिरता प्रदान करते. कंपनी टाटा पंचमध्ये १.२ लीटर ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन वापरत आहे. हे इंजिन ८८ bhp ची कमाल पॉवर आणि ११५ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यात ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स तसेच ५-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. टाटा पंच पेट्रोलमध्ये २०.०९kmpl आणि CNG मध्ये २६.९९km/kg मायलेज देते.
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, पंचमध्ये ७-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल, ऑटो एअर कंडिशनिंग, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, रियर डिफॉगर, रिअर पार्किंग सेन्सर, रियर-व्ह्यू कॅमेरा आणि ISOFIX अँकर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.