मारुती सुझुकीच्या कार देशात सर्वाधिक विकल्या जातात. देशातील आघाडीची कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाची एकूण वाहन विक्री सप्टेंबरमध्ये वार्षिक आधारावर ३ टक्क्यांनी वाढली आणि १,८१,३४३ युनिट्सवर पोहोचली, जी एका महिन्यातील सर्वात जास्त विक्रीचा आकडा आहे. एवढेच नाही तर आजपर्यंत टाटा, महिंद्रा, टोयोटा किंवा इतर कोणतीही कार उत्पादक कंपनी भारतात एकाच महिन्यात इतक्या कारची विक्री करु शकलेली नाहीये.
मारुती सुझुकी इंडियाची घाऊक विक्री
मारुती सुझुकीने सप्टेंबर २०२२ मध्ये १,७६,३०६ मोटारींची घाऊक विक्री केली होती, जी सप्टेंबर २०२३ मध्ये ३ टक्क्यांनी वाढून १,८१,३४३ युनिट्सवर पोहोचली. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या महिन्यात, देशांतर्गत बाजारपेठेत प्रवासी वाहनांची विक्री २ टक्क्यांनी वाढून १,५०,८१२ युनिट्स झाली, जी सप्टेंबर २०२२ मध्ये १,४८,३८० युनिट्स होती.
कार विक्री
कंपनीने सांगितले की, सप्टेंबरमध्ये त्यांच्या एंट्री-लेव्हल कारच्या १०,३५१ युनिट्स – अल्टो आणि एस-प्रेसोची विक्री झाली, जी गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमधील २९,५७४ युनिट्सपेक्षा ६५ टक्के कमी आहे. त्याच वेळी, कॉम्पॅक्ट कारची विक्रीही सप्टेंबरमध्ये ६८,५४२ युनिट्सवर घसरली, जी मागील वर्षी याच महिन्यात ७२,१७६ युनिट्स होती, तर युटिलिटी वाहनांची विक्री सप्टेंबर २०२३ मध्ये ८२ टक्क्यांनी वाढून ५९,२७१ युनिट्सवर गेली, जी ५९,२७१ युनिट्स होती. गेल्या वर्षी (२०२२) सप्टेंबरमध्ये ३२,५७४ युनिट्स होती.
(हे ही वाचा : बाकी कंपन्यांचे उडाले होश, देशात दाखल झाली होंडाची स्वस्त बाईक, बुकिंगही सुरू, मिळतेय तब्बल दहा वर्षांची वॉरंटी )
एप्रिल-सप्टेंबर दरम्यान विक्री
एप्रिल-सप्टेंबर दरम्यान कंपनीच्या एकूण विक्रीने प्रथमच १० लाख युनिट्सचा आकडा ओलांडला आहे. MSI ने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत १०,५०,०८५ वाहने डीलर्सना पाठवली आहेत तर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ही संख्या ९,८५,३२६ वाहने होती.
निर्यात
कंपनीने सप्टेंबरमध्ये २२,५११ वाहनांची निर्यात केल्याचे सांगितले, तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निर्यातीचा आकडा २१,४०३ वाहनांचा होता, असेही कंपनीने नमूद केले.