Care Tips And Tricks: अनेक जण दूरच्या प्रवासासाठी कारने प्रवास करायला प्राधान्य देतात. बऱ्याचदा एखाद्या दुर्गम भागातून प्रवास करत असताना बॅटरी कमी असल्यामुळे अचानक कार थांबते. अशा भागात अनेकदा मेकॅनिकही मिळणं कठीण असतं. अशावेळी तुम्ही तुमची गाडी कशी सुरू करू शकता, याबाबत आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

प्रवासात कार सुरू करण्यासाठी टिप्स

प्रवासासाठी घरातून निघण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कारच्या डिकीमध्ये नेहमी जंपर केबल्स ठेवायला हव्यात. जेव्हा तुमच्या वाहनाला जंपस्टार्टिंगची आवश्यकता असते, तेव्हा हे आवश्यक असते.

कार रस्त्याच्या मध्येच अचानक थांबल्यावर ती सुरू करण्यासाठी दुसऱ्या वाहनाची आवश्यकता लागते. अशावेळी त्या रस्त्यावरून जाणारे कोणतेही वाहन थांबवा आणि मदतीसाठी विचारा. नंतर दोन्ही कार तटस्थपणे पार्क करा आणि दोन्ही कारचे इग्निशन बंद करा. यानंतर दोन्ही गाड्यांना पार्किंग ब्रेक लावा. कार सुरू करण्यासाठी जम्पर केबल्स योग्यरित्या कनेक्ट करा.

जंपरची लाल क्लिप तुमच्या कारच्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी जोडा. या ठिकाणी तुम्हाला POS किंवा + चिन्ह दिसेल, जे नकारात्मक टर्मिनलपेक्षा मोठे असेल. नंतर दुसरी लाल क्लिप दुसऱ्या कारवरील सकारात्मक टर्मिनलशी जोडा. दोन काळ्या क्लिपपैकी एक दुसऱ्या कारच्या बॅटरीच्या नकारात्मक टर्मिनलला आणि शेवटची काळी क्लिप तुमच्या कारच्या पेंट न केलेल्या धातूशी जोडा.

त्यानंतर जंपर केबल्स कनेक्ट केल्यानंतर दुसरी कार सुरू करा आणि तिचे इंजिन काही मिनिटे चालू ठेवा. यानंतर तुमची कार सुरू करण्याचा प्रयत्न करा. तुमची कार सुरू होत नसल्यास, केबल्स योग्यरित्या जोडल्या गेल्या आहेत की नाही हे तपासून पाहा. दुसऱ्या कारचे इंजिन जवळपास पाच मिनिटे चालल्यानंतर, तुमची कार सुरू करण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा: थंडीच्या दिवसात बाईक रायडिंग करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींची घ्या विशेष काळजी

तुमची बंद केलेली कार सुरू होत असल्यास, तुमच्या कारचे इंजिन बंद करू नका. ते सुमारे १०-१५ मिनिटे सुरू ठेवा, जेणेकरून तुमच्या कारची बॅटरी चार्ज होईल. परंतु, जर एखादी गाडी थांबलीच नाही, अशावेळी तुम्ही जवळच्या गॅरेजशी संपर्क करा.