भारतात लवकरच स्वतःची कार सुरक्षा रेटिंग प्रणाली असेल, अशी घोषणा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. याआधी कारच्या मागील सीटवर थ्री-पॉइंट बेल्ट सिस्टम अनिवार्य करण्याबाबत बोलले होते. त्यानंतर आता कारच्या सुरक्षेशी संबंधित ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी २०१६ मध्ये, केंद्र सरकारने वाहन उत्पादकांच्या इच्छेनुसार सुरक्षा वैशिष्ट्यांच्या आधारावर नवीन प्रवासी कारसाठी स्टार रेटिंग कार्यक्रम प्रस्तावित केला होता. त्यामुळे हा प्रस्ताव तेव्हा लागू होऊ शकला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील ऑटोमोबाईल सेफ्टी इकोसिस्टममध्ये पत्रकार परिषद संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी लवकरच भारतात स्वतंत्र वाहन सुरक्षा रेटिंग कार्यक्रम सुरू केला जाईल, अशी घोषणा केली आहे.
भारत सरकारकडून आणल्या जाणार्या या कार सेफ्टी रेटिंग प्रोग्रामला न्यू कार असेसमेंट प्रोग्राम म्हणजेच NCAP असे संबोधले जाईल. याशिवाय, केंद्र सरकार नवीन कारसाठी काही महत्त्वाच्या सुरक्षा वैशिष्ट्यांच्या अंमलबजावणीची घोषणा देखील करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “भारतातील कार उत्पादकांनीही जागतिक सुरक्षा मानकांचा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे सरकार लवकरच भारत NCAP, एक स्वतंत्र कार अपघात चाचणी आणणार आहे, ज्यामध्ये विविध सुरक्षा कारचे रेटिंग मानकांच्या आधारे निश्चित केले जाईल. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपियन युनियन आणि जापान सारख्या देशांमध्ये चालणाऱ्या सुरक्षा रेटिंग कार्यक्रमाच्या बरोबरीने असेल आणि हा एनसीएपी नवीन कार खरेदीदारांना योग्य निवड करण्यास मदत करेल.”
Video: ई-सायकल किट पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा खूश, व्हिडीओ ट्वीट करत म्हणाले, “अभिमान वाटेल…”
भारत सरकार सध्या कारच्या सुरक्षेशी संबंधित सेफ्टी रेटिंग प्रोग्राम आणण्याव्यतिरिक्त कारच्या सर्व मागील सीटवर तीन-पॉइंट सीट बेल्ट सिस्टम आणि सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावावर काम करत आहे. भारतातील सध्याचे सुरक्षा प्रोटोकॉल कालबाह्य असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, केंद्र सरकारकडून वाहनांच्या सुरक्षा मानकांमध्ये सुधारणा करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर भर दिला जात आहे. यासाठी लोकांकडून सूचना घेतल्या जात आहेत.