Why do People come out of the vehicle while filling CNG?: देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे त्रस्त झालेल्या वाहन चालकांसाठी सीएनजी हा एक उत्तम पर्याय आहे. हल्ली देशातल्या बहुतांश वाहन निर्मात्या कंपन्या त्यांच्या छोट्या कार्समध्ये सीएनजी मॉडेलचा पर्याय देऊ लागल्या आहेत. अल्पावधीतच भारतात सीएनजी वाहनांनी खूप लोकप्रियता मिळवली आहे. पण तुमच्या लक्षात आले असेल की, तुम्ही कधी तुमच्या कारमध्ये सीएनजी भरण्यासाठी गेले आणि गॅस भरताना गाडीत बसलेल्या सर्वांना खाली उतरण्यास सांगितले जाते, असं का केलं जातं, हा प्रश्न तुमच्या मनात आलायं का, चला तर मग जाणून घेऊया सीएनजी भरताना लोकांना कारमधून खाली का उतरवतात..?
CNG भरताना लोकं कारमधून बाहेर का उतरतात?
- सीएनजी भरताना लोकांना गाडीतून खाली का उतरवतात याचं पहिलं कारण म्हणजे, भारतात फॅक्टरी फिटेड सीएनजी वाहनांचा अभाव. वास्तविक, भारतातील अनेक लोक त्यांच्या कारमध्ये बाहेरील मेकॅनिककडून सीएनजी किट बसवून घेतात. आफ्टरमार्केट CNG किट असलेल्या वाहनांमध्ये, CAG फिलर नॉब एकतर मागील बूटमध्ये किंवा मधल्या सीटखाली असतो. अशा परिस्थितीत लोकांना सीएनजी भरण्याचे नॉब कुठे आहे हेच कळत नाही, त्यामुळे रिफिलिंग करताना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून लोकांना खाली उतरण्यास सांगितले जाते.
(हे ही वाचा : CNG कार घेताय, 10 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ टॉप 6 आलिशान सीएनजी कार, फीचर्सही जबरदस्त )
- सीएनजी रिफिलिंग घेताना सुरक्षेच्या दृष्टीने लोकांना गाडीतून खाली उतरण्यास सांगितले जाते. सीएनजी वाहनात बसवलेल्या टाकीमध्ये खूप जास्त दाबाने साठवले जाते. टाकी रिफिल करताना गळती किंवा स्फोट झाल्यास, लोकांना पळून जाण्याची संधी मिळू शकते, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवाशांना खाली उतरण्याचा सल्ला देण्यात येतो.
- सीएनजी विषारी नाही, पण त्याचा वास तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहनांमधील सीएनजी गळतीमुळे लोकांना डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, या समस्या टाळण्यासाठी, रिफिलिंग स्टेशनवर वाहनातून बाहेर पडणे शहाणपणाचे ठरते.
- याशिवाय सीएनजी पंपाची रचना पेट्रोल किंवा डिझेल पंपापेक्षा वेगळी आहे. अशा ग्राहकांना फसवणूक टाळण्यासाठी गाडीतून उतरून सीएनजी पंपाचे मीटर रीडिंग तपासण्याचा सल्ला दिला जातो.