पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहता मागच्या काही वर्षाती सीएनजी आणि इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. सीएनजीची वाढती मागणी लक्षात घेऊन मारुती आणि ह्युंदाई सारख्या प्रमुख ऑटोमेकर्स कंपनीने सीएनजी किट असलेले बहुतेक मॉडेल्स आणले आहेत. सीएनजी किट बसवलेल्या कमी बजेटच्या कारमध्ये मारुतीच्या अल्टो आणि वॅगनआरची सर्वाधिक विक्री आहे. ह्युंदईची सँट्रो, ग्रँड आय टेनलाही पसंती दिली जात आहे. ह्युंदईच्या फॅक्टरी फिटेड सीएनजी किट सेडान कार ऑरा देखील ग्राहकांना खूप आवडते. असं असलं तरी सध्या बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती सर्वाधिक असून केंद्र आणि राज्य सरकार यावर सब्सिडी देत आहेत. त्यामुळे सीएनजी की इलेक्ट्रिक कार असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
भारतीय ग्राहक कार खरेदी करण्यापूर्वी त्याची किंमत जाणून घेतात. सामान्य मध्यमवर्गीय ग्राहक बजेटमध्ये चांगला मायलेज असलेली कार घेण्याला जास्तीत जास्त महत्त्व देतात. जेव्हा सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारमधील निवडीचा विचार केला जातो. तेव्हा सध्यातरी सीएनजी कार किंमतीच्या बाबतीत पहिली पसंती आहे. कारण सध्या इलेक्ट्रिक कारपेक्षा सीएनजी कार स्वस्त आहेत. देशातील बहुतेक इलेक्ट्रिक कार प्रीमियम किंवा 10 लाख श्रेणीत उपलब्ध आहेत. टाटा नेक्सन इलेक्ट्रिक कार ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. एक्स-शोरूम किंमत १४.२४ लाख रुपये आहे. पेट्रोल व्हर्जनबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत ७.२९ लाख रुपयांपासून सुरू होते. तर सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टाटा टिगॉर इलेक्ट्रिक कारची किंमत ११.९९ लाख रुपयांपासून सुरू होते, ती १३.१४ लाख रुपयांपर्यंत जाते. तर त्याच्या पेट्रोल मॉडेलची किंमत ५.६७ लाख ते ७.८४ लाख रुपये आहे. म्हणजेच सध्या पेट्रोल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार खरेदी करणे थोडे महागडे आहे.
सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारमध्ये कोणती अधिक फायदेशीर आहे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. बहुतेक सीएनजी कार ३० किमी/किलोपर्यंत मायलेज देतात. दिल्लीत सीएनजीची किंमत सुमारे ५३ रुपये प्रति किलो आहे. त्यानुसार एका सीएनजी कारचा प्रति किलोमीटरचा खर्च तीन ते चार रुपये येतो. त्यात देखभाल खर्चाचाही समावेश आहे. सीएनजी कारच्या किमतीची पेट्रोल-डिझेल कारशी तुलना केल्यास सीएनजी कारचा खर्च खूपच कमी आहे. दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहन करण्यासाठी तुम्हाला प्रति युनिट ४.५ रुपये द्यावे लागतात. त्यानुसार १५० किमी अंतरापर्यंत जाणाऱ्या कारची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी १६ युनिट वीज लागते. म्हणजेच, इलेक्ट्रिक कारला प्रति किलोमीटर १ रुपये पेक्षा कमी खर्च आहे.