Car Safety Tips: भारतात दिवाळी हा सण सर्वात उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जाणारा सण आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा सण साजरा केला जाईल. या दिवसात देवाची पूजा-आराधान, मिठाई, लायटिंग, नवीन कपडे यांसह अनेक जण फटाकेदेखील फोडतात. फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा धोका निर्माण होतो, तसेच यामुळे मनुष्यांसह प्राणी, पक्षी यांनादेखील त्रास होतो; शिवाय निष्काळजीपणामुळे अनेकांच्या गाडीचेदेखील नुकसान होते. दिवाळीत फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे तुमची गाडी खराब होण्यापासून तुम्ही वाचवू शकता. याबाबत आज आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.
दिवाळीत विविध फटाके फोडले जातात. अशा परिस्थितीत कव्हर्ड पार्किंगमध्येच गाडी पार्क करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे केल्याने कारच्या आजूबाजूला फटाक्यांच्या ठिणग्यांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
तसेच दिवाळीत गाडी कधीही झाकून ठेवू नका. कारण कारचे कव्हर खूपच पातळ असते. फटाके फोडताना गाडीच्या कव्हरवर छोटीशी ठिणगी जरी पडली तरी आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी तुमच्या निष्काळजीपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते. दिवाळीच्या काळात मोकळ्या जागेवर गाडी उभी केल्यास ती झाकून ठेऊ नका.
दिवाळीच्या दिवसात तुम्ही कार चालवत असाल तर नेहमी सावधगिरीने गाडी चालवा. कारण काही वेळा जळलेले रॉकेट अचानक गाडीवर पडतात. अनेक ठिकाणी मोठ्या आवाजाचे फटाकेही फोडले जातात, त्यामुळे दिवाळीत फटाके फोडले जात असतील तर गाडी चालवताना अधिक काळजी घ्या.
हेही वाचा: दुर्गम भागात कार अचानक बंद पडली? ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर
दिवाळीत गाडी चालवताना गाडीच्या खिडक्या बंद ठेवाव्यात. खिडकी उघडी असल्यास, फटाके किंवा जळणारे रॉकेट कारच्या आत येऊ शकतात. असे झाल्यास कारचे नुकसान आणि तुम्हालाही दुखापत होऊ शकते.