टाटा कंपनीचे माजी चेअरमेन सायरस मिस्त्री यांचा एका रोड अपघातात मृत्यू झाला होता. मिस्त्री हे कारच्या मागील सीटवर बसलेले होते आणि त्यांनी सीट बेल्ट घातली नव्हती. या घटनेनंतर कारच्या मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा वाढवण्याला केंद्राकडून प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये पोलिसांनी चारचाकी वाहनाच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावता बसणाऱ्या नागरिकांना दंड ठोठावला आहे.
१ हजार रुपयांचा दंड
दिल्ली वाहतूक पोलिसांनी काल मध्य दिल्लीमध्ये दोन तासांची मोहीम राबवली होती. या दरम्यान वाहतूक पोलिसांनी गाडीच्या मागच्या सीटवर सीट बेल्ट लावून न बसणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली. पोलिसांनी १७ वाहनधारकांना चलान जारी करून १ हजार रुपयांचा दंड ठोठवाला आहे.
१७ चलान जारी
पोलिसांनी काल पहिल्या दिवशी मध्य दिल्लीतील कनॉट प्लेस जवळील बाराखंबा रोडवर हा उपक्रम राबविला. यादरम्यान पोलिसांनी दुपारी १७ चलान जारी केले. नियम तोडणाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सकाळी ११ ते दुपारी एक वाजेपर्यंत मोटार वाहन कायद्याच्या कलम १९४ बी अंतर्गत एकूण १७ चालान जारी करण्यात आले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
दिल्ली वाहतूक पोलीस आधीच सीट बेल्ट घालण्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम राबवत आहेत. गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांनी ट्विटरवर नागरिकांना नेहमी सीट बेल्ट घालण्याचे आवाहन केले होते. मात्र काल झालेल्या कारवाईनंतर नागरिक पोलिसांच्या आवाहनाला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले आहे.
नियम तोडणाऱ्यांना दंड ठोठावला जाणार – गडकरी
नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील सीटबेल्ट न घालणाऱ्यांवर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी वाहनाच्या मागच्या सीटवर बसलेल्या नागरिकांनी सीट बेल्ट घालण्याचे आवाहन केले होते. कुठल्याही हालतील जीव वाचवणे महत्वाचे असल्याने नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, दंड ठोठावला जाईल असा इशारा गडकरी यांनी दिला होता. तसेच कारच्या मागच्या सीटसाठी सीट बेल्ट अलार्म प्रणाली उपलब्ध करून देणे ऑटो कंपन्यांसाठी अनिवार्य करण्याची योजना मंत्रालय आखत असल्याचेही गडकरी यांनी उघड केले होते.