Driving Tips: सध्या दिवाळीचे दिवस सुरू असून, या दिवसांत गाड्यांची विशेष काळजी घेतली जाते. कारण- आता देशात गाड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रस्त्यांवर खूप वर्दळ दिसून येते. त्यातच काही लोक व्यवस्थित गाडी चालवत नाहीत. त्यामुळे व्यवस्थित वाहन चालविणाऱ्या इतर चालकांना आणि पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. सणासुदीच्या दिवसांत रस्त्यांवर गाड्यांची भरपूर गर्दी असते. रस्त्यावर अनेक जण फटाके फोडतात. त्यामुळे दिवाळीमध्ये गाडी चालविताना सतर्क राहिले पाहिजे. दिवाळीत गाडी चालविताना सुरक्षित प्रवासासाठी लक्षात ठेवावयाच्या पाच गोष्टी खालीलप्रमाणे :
१) गाडीच्या खिडक्या बंद ठेवा
फटाका जरी दूर फुटला तरी त्याचे अवशेष गाडीच्या खिडक्यांतून आत शिरू शकतात. त्यामुळे प्रवास करताना गाडीच्या खिडक्या बंद ठेवा.
२) एसी बंद ठेवा
फटाके फुटत असलेल्या ठिकाणी एसी बंद ठेवा. फटाक्यांचा धूर मानव आणि प्राण्यांसाठी घातक असतो. कारमध्ये धूर अडविणारे फिल्टर्स असतात. ते केबिनमध्ये हा धूर जाऊ देत नाहीत. तरीदेखील सावधगिरी म्हणून अशा परिस्थिती कारचा एसी बंद ठेवणेच इष्ट ठरेल.
३) फटाक्यावरून गाडी नेऊ नका
फटका पेटताना दिसल्यास गाडी लगेच थांबवा आणि तो फुटल्यानंतरच पुढे न्या. जर तुम्हाला त्याच वेळी तातडीनं जाणं गरजेचं असेल, तरच फटाक्यापासून लांब अंतरावरून कार पुढे न्या. कारण- कारच्या खालच्या बाजूला वायरिंग, रबर आणि इतर साहित्य असते; ज्यांना आग लागू शकते.
४) पुढे जायचे असल्यास फटाका फोडणाऱ्याला कळवा
कोणी फटाका फोडायच्या तयारीत असेल आणि तुम्हाला त्याने फटाका फोडण्याआधी पुढे जायचे असेल, तर मग हॉर्न वाजवा आणि हेडलाईट फ्लॅश करून फटाका फोडणाऱ्याला तशी आगाऊ सूचना द्या आणि मगच पुढे जा.
हेही वाचा: कार चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स करतील मदत
५) गाडी हळू चालवा
दिवाळीत रस्त्यावर गाड्यांची खूप वर्दळ असते. त्यामुळे गाडी हळू चालवा. गाडी हळू चालविल्याने तुमच्या गाडीच्या मागे-पुढे कोण आहे. गाडी काढण्यासाठी किती जागा आहे आदी सर्व गोष्टींचा अंदाज येतो.