Bike Servicing: जर तुम्ही तुमच्या बाईकची वेळोवेळी सर्व्हिसिंग केली, तर तिची कार्यक्षमता आणि आयुष्य चांगले राहते. पण बऱ्याचदा बाईक सर्व्हिसिंग केल्यानंतरही चांगली कामगिरी देत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. खरे तर, सर्व्हिसिंगदरम्यान मेकॅनिक काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे नंतर समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्याकडे लक्ष न दिल्याने तुमचे नुकसान होऊ शकते.
इंजिन ऑइल न तपासणे
बाईकच्या इंजिनासाठी इंजिन ऑइल ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याचदा मेकॅनिक फक्त तेलाचे प्रमाण पाहून, तेल योग्य असल्याचे गृहीत धरतात; पण त्याचा दर्जा तपासत नाहीत. खराब किंवा जुने इंजिन ऑइल तुमच्या बाईकच्या कामगिरीवर प्रतिकूल परिणाम करू शकते आणि इंजिनाचे आयुष्य कमी करू शकते.
एअर फिल्टर साफ न करणे
बाईकच्या एअर फिल्टरमध्ये धूळ व घाण साचल्याने इंजिनाची कार्यक्षमता आणि मायलेज कमी होऊ शकते. बऱ्याच वेळा मेकॅनिक ते योग्यरीत्या स्वच्छ करत नाहीत किंवा बदलण्याची आवश्यकता असतानाही ते बदलत नाहीत, ज्यामुळे बाईक खराब होऊ शकते.
ब्रेक शूज आणि ब्रेक फ्लुइडकडे दुर्लक्ष
ब्रेक सिस्टीमची योग्य रीतीने तपासणी करणे खूप महत्त्वाचे असते. बऱ्याच वेळा मेकॅनिक ब्रेक शूज तपासत नाहीत, ज्यामुळे ब्रेकची कार्यक्षमता कमी होऊ शकते. तसेच ब्रेक फ्लुइडची गुणवत्ता तपासली जात नाही. कारण- त्यामुळे ब्रेकिंग सिस्टीम कमकुवत होऊ शकते आणि अपघातांचा धोका वाढू शकतो.
साखळी आणि स्प्रॉकेटचा योग्य ताण न राखणे
बऱ्याच वेळा सर्व्हिसिंगदरम्यान मेकॅनिक साखळी खूप घट्ट किंवा सैल सोडतात, ज्यामुळे साखळी लवकर खराब होऊ शकते आणि बाईक चालवताना समस्या निर्माण होऊ शकतात.
टायर प्रेशर आणि अलाइनमेंट न तपासणे
टायरमध्ये योग्य तेवढे प्रेशर आणि अलाइनमेंट नसल्यानेही बाईकचे संतुलन बिघडू शकते आणि मायलेजवर परिणाम होऊ शकतो. अनेक वेळा मेकॅनिक टायरची स्थिती योग्य रीतीने तपासत नाहीत आणि त्यामुळे टायर फाटतो वा लवकर घासला जातो.
हा त्रास कसा कमी करता येईल?
- सर्व्हिसिंगदरम्यान मेकॅनिकला सर्व आवश्यक तपासणी करण्यास सांगा.
- बाईकची सर्व्हिसिंग केल्यानंतर सर्व पार्ट्सची व्यवस्थित देखभाल केली गेली आहे की नाही ते स्वतः तपासून पाहा.
- जर इंजिन ऑइल, ब्रेक शू व एअर फिल्टर यांसारख्या गोष्टी बदलणे आवश्यक असेल, तर त्याकडे विशेष लक्ष द्या.
- तुमच्या बाईकची सर्व्हिसिंग नेहमी विश्वसनीय आणि अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्येच करा.