Bike Journey Tips: पावसाळ्यात प्रवास करताना बाईक मध्येच बंद पडणं ही सामान्य गोष्ट आहे. पण, जर सतत बाईक बंद पडत असेल, तर तुमच्या बाईकमध्ये काहीतरी बिघाड झाला असल्याचे ते लक्षण आहे. आज आम्ही तुम्हाला बाईकमध्ये होणारा बिघाड कशा प्रकारे तुम्ही नियंत्रणात ठेवू शकता. याबाबत सांगणार आहोत.

ओव्हर लोडिंग किंवा ट्रिपलिंग

बाईकमध्ये ट्रिपलिंग किंवा जास्त सामान इंजिनावर ठेवल्याने जास्त दबाव येतो. बाईकची इंजिन क्षमता जास्त नसते. त्यामुळे इंजिनावर जास्त दाब पडून, इंजिन जास्त गरम होऊन गाडी मधेच बंद पडते. जास्त वेळा ओव्हरलोड सामान वाहून नेल्याने इंजिनामध्ये इतर समस्यादेखील उदभवू शकतात.

रुंद टायर

हल्ली रुंद टायर्सचा खूप ट्रेंड चालू आहे. या टायर्सचे वजन सामान्य टायरपेक्षा जास्त असते. जास्त वजनामुळे ते इंजिनावर अधिक दबाव टाकतात. त्यामुळे इंजिन लवकर गरम होते. तसेच रुंद टायर्ससह बाईक वेगाने चालविल्याने इंजिन जास्त गरम होते आणि बंद पडते.

इंजिन ऑइल

बाईकचे इंजिन ऑइल नियमितपणे बदलले जात नसेल, तर त्यामुळे इंजिन खराब होऊ शकते. इंजिन ऑइल जितके जुने होईल, तितके ते घट्ट होते. त्यामुळे बाईकचे इंजिन थंड राहत नाही आणि म्हणून बाईक सतत बंद पडते.

एअर फिल्टर

एअर फिल्टर इंजिनाला शुद्ध हवा पोहोचवण्याचे काम करते. त्यामुळे इंजिन योग्य प्रकारे काम करते. जर फिल्टर जुना व खराब असेल, तर स्वच्छ हवा इंजिनापर्यंत पोहोचत नाही आणि एअर इंजिन काम करणे थांबविते. त्यामुळे एअर फिल्टर नियमितपणे बदलत राहा.

हेही वाचा: बाईक किंवा स्कुटी चालवायला शिकत आहात? मग या महत्त्वाच्या टिप्सचा करा वापर

बाईक बंद पडल्यास काय कराल?

बाईकमधून जर काळा धूर निघत असेल, तर त्याचा अर्थ इंजिन ऑइल संपले आहे. बाईक सुरू करताना आवाज येतो आणि त्यामुळे बाईक अचानक थांबते.

जर तुमची बाईक प्रवास करताना रस्त्याच्या मधोमध थांबली, तर सर्वप्रथम बाईकमधील प्लग तपासा. बाईक सुरू करण्यासाठी स्पार्क प्लग खूप महत्त्वाचा आहे. जर बाईकचा प्लग सैल असेल किंवा स्पार्क वायर सैल असेल, तर त्यामुळेही बाईक बंद पडते. अशा वेळी मेकॅनिककडून बाईक दुरुस्त करून घ्या. लांब पल्ल्याच्या प्रवासाला जात असाल, तर अगोदर एक टूल बॉक्स सोबत ठेवा.

बाईक अचानक थांबली, तर बाईकचा क्लच नीट काम करीत आहे की नाही ते तपासा. बऱ्याचदा वेगाने बाईक चालविण्याने वायर तुटते.