हिरो मोटोकॉर्प या मोटरसायकल्स व टू-व्हीलर्सच्या जगातील सर्वांत मोठ्या उत्पादक कंपनीने ‘व्हिडा’ पॉवर्ड बाय हिरो, या आपल्या उदयोन्मुख वाहतूक सोल्युशन्सच्या नवीन ब्रॅण्डची घोषणा केली आहे. यामध्ये आगामी इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा (इव्ही) समावेश आहे. व्हिडा, पॉवर्ड बाय हिरो या ब्रॅण्डखाली हिरो मोटोकॉर्प आपले उदयोन्मुख वाहतूक उत्पादनांचे उपक्रम सर्वांपुढे आणेल. यातील पहिले उत्पादन इलेक्ट्रिक वाहन असेल आणि ते १ जुलै २०२२ रोजी हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन एमेरिटस डॉ. ब्रिजमोहनलाल यांच्या जयंतीचे औचित्य साधून लाँच केले जाईल. नवीन व्हिडा मॉडेलचे उत्पादन हिरो मोटोकॉर्पच्या भारतातील चित्तूर येथील ‘ग्रीन’ उत्पादन कारखान्यात केले जाईल. विक्री २०२२ च्या अखेरच्या भागात सुरू होईल. हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवन मुंजाल यांनी यावेळी १०० दशलक्ष डॉलर्सच्या ग्लोबल सस्टेनिबिलिटी फंडाचीही घोषणा केली. बीएमएल मुंजाल युनिव्हर्सिटी आणि हिरो मोटोकॉर्पच्या नेतृत्वाखाली जागतिक सहयोग प्रस्थापित करण्याचे या निधीचे उद्दिष्ट आहे. पृथ्वीवर सकारात्मक प्रभाव करणाऱ्या ईएसजी सोल्युशन्समधील १०,००० आँत्रप्रेन्युर्सना प्रशिक्षण देण्याच्या उद्देश आहे. दुबईत झालेल्या सोहळ्याला जागतिक विचारवंत, सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी व यूएईमधील प्रशासकीय अधिकारी, धोरणकर्ते तसेच हिरो मोटोकॉर्पच्या अनेक भागधारकांची उपस्थिती होती. यांमध्ये संचालक मंडळाचे सदस्य, जगभरातील वरिष्ठ कर्मचारी, डीलर्स, जागतिक वितरक, पुरवठा साखळीतील पार्टनर्स व अन्य सहयोगींचा समावेश होता.
शाश्वततेवर लक्ष केंद्रित करून तसेच पुढील पिढ्यांसाठी समृद्ध, अर्थपूर्ण जग ठेवण्याच्या उद्दिष्टासह डॉ. मुंजाल यांनी हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक कृतीबिंदूंवर प्रकाश टाकला. नवीन ब्रॅण्ड लोगोचे अनावरण करत आणि व्हिडाची ओळख सर्वांपुढे आणत डॉ. पवन मुंजाल म्हणाले, “व्हिडा म्हणजे जीवन आणि या ब्रॅण्डचे एकमेव उद्दिष्ट जगावर सकारात्मक प्रभाव निर्माण करणे व आपल्या सर्वांना अर्थपूर्ण मार्गांनी पुढे घेऊन जाणे हेच आहे. आम्ही आपल्या मुलांसाठी व पुढील पिढ्यांसाठी जे उभे करत आहोत, त्यासाठी हे नाव चपखल आहे, असे आम्हाला वाटते. ही खऱ्या अर्थाने एका विशेष गोष्टीची पहाट आहे. आजपासून केवळ १७ आठवड्यांत आम्ही आमचा व्हिडा प्लॅटफॉर्म, उत्पादने व सेवा सर्वांपुढे आणू व त्या माध्यमातून जग अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करू.”
“जेव्हा मी आपल्या भविष्यकाळातील पिढ्यांचा, विशेषत: माझ्या नातवंडांचा विचार करतो तेव्हा मला आशावादी भविष्यकाळ उभारण्याची इच्छा होते. हा भविष्यकाळ सकारात्मक ऊर्जेने भरलेला असला पाहिजे, पर्यावरणपूरक असला पाहिजे, या भविष्यकाळातून प्रत्येकाला काहीतरी मिळाले पाहिजे आणि प्रत्येकाने तो अधिक भव्य व अधिक चांगला करण्यात सहभागी झाले पाहिजे. ‘व्हिडा’च्या निर्मितीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाला ज्या मार्गाने पुढे जायचे असेल, त्या मार्गाने जाताना, जोमाने वाढण्याची आणि अधिक चांगले जगण्याची संधी देऊ करणार आहोत. या उपक्रमाचे नेतृत्व मी स्वत: आघाडीवर राहून करणार आहे,” असे डॉ. मुंजाल पुढे म्हणाले.