Driving Tips: हल्ली अनेकांसाठी कार चालवायला शिकणं फार मोठी गोष्ट नाही, थोड्या सरावानंतरही काही जण गाडी चालवायला शिकतात. पण, गाडी चालवताना व्यवस्थित कसे बसायचे हे फार कमी लोकांना माहिती असते. गाडी चालवताना व्यवस्थित बसले नाही तर अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे गाडी चालवणे खूप कठीण होते. आज आम्ही तुम्हाला गाडी चालवताना कसे बसावे याबाबत काही टिप्स सांगणार आहोत.

गाडी चालवताना ‘या’ टिप्स करा फॉलो

गाडी चालवताना तुम्हाला बराच वेळ सीटवर बसावे लागते, म्हणून सीट जास्त मागे झुकलेली नसावी, जर तुम्ही गाडी चालवताना सीट सुमारे १०० ते ११० अंशांवर झुकवली, तर ते तुम्हाला केवळ आरामच देत नाही तर पाठीच्या समस्यादेखील टाळते.

काही लोक स्टीअरिंग व्हीलच्या अगदी जवळ राहून गाडी चालवतात. असे केल्याने अपघाताच्या वेळी तुम्हाला नुकसान होऊ शकते. गाडी चालवताना सुरक्षिततेसाठी स्टीअरिंग व्हीलपासून सुमारे १० इंच अंतर राखले तर गाडी चालवणे सोपे होईल.

बरेच लोक गाडी चालवताना त्यांच्या पाठीच्या खालच्या भागाची काळजी घेत नाहीत, यामुळे त्या भागात वेदना होतात आणि सतत गाडी चालवताना समस्या निर्माण होतात. यासाठी जेव्हाही तुम्ही सीटवर बसता, तेव्हा तुमचा खालचा भाग सीटजवळ व्यवस्थित ठेवा. अशा प्रकारे तुम्हाला कमरेचा आधार चांगला मिळेल आणि जास्त वेळ गाडीत बसणे कठीण वाटणार नाही.

जर तुम्ही तुमच्या सीटबरोबर वरील टिप्स फॉलो केल्या तर पेडल दाबण्याची योग्य पद्धत आपोआप येईल. गाडी चालवताना, पेडल दाबताना गुडघे सुमारे १२० अंशांवर असले पाहिजेत. जर असे झाले तर तुम्हाला पेडल दाबताना जास्त प्रयत्नही करावे लागणार नाहीत.