भारतात इंधनाचे दर गगनाला भीडत असताना मागील काही दिवसांत इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीत वाढ झाली होती. पण मे महिन्यात इलेक्ट्रिक दुचाकींच्या नोंदणीत घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. वाहन पोर्टलवरील वाहन नोंदणी आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात ३९ हजार ३३९ नवीन इलेक्टिक दुचाकीची नोंदणी झाली. तर मे महिन्यात त्यामध्ये २० टक्क्यांची घट झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, इलेक्ट्रिक दुचाकीच्या नोंदणीतील घसरण ही तात्पुरत्या स्वरुपाची असून याचा प्रभाव जून ते जुलै महिन्याच्या पुढे टिकणार नाही. सध्या बाजारात मागणीपेक्षा अधिक इलेक्ट्रिक दुचाकींचा पुरवठा केला जात आहे. काही तज्ज्ञांनी सांगितलं की, इलेक्ट्रिक दुचाकी पुरवठा साखळीतील व्यत्यय, EV बॅटरींबाबतची असुरक्षितता, वाहनांची गुणवत्ता यामुळे वाहनांच्या विक्रीत घट झाल्याचं दिसत आहे.
तसेच इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटना घडल्याने कंपन्या सतर्क झाल्या असून त्यांना उत्पादनांच्या मानकांचं पुनर्मूल्यांकन करावं लागत आहे. याशिवाय, ईव्ही बॅटरीबाबत सुरक्षा मानके लवकरच आणली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे ई-स्कूटर कंपन्या सावध झाल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितलं की, “अलीकडे नोंदवलेल्या ईव्ही वाहनांमध्ये गुणवत्तेबाबत समस्या आणि आग लागण्याच्या असंख्य घटनांमुळे खरेदीदारांच्या मनात थोडी भीती आहे. यामुळे मागणीत दीर्घकालीन मंदी येत नसली तरी काही ग्राहक इलेट्रिक वाहन उशिरा खरेदी करणं पसंत करत आहेत. तसेच बॅटरी सुरक्षा नियमांचं पालन करण्याबाबत भारत सरकार आणि OEM काय निर्णय घेणार? याकडे उत्पादक कंपन्यांचं डोळे लागले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीत थोडीशी घट झाली आहे.”